योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : 'ज्ञानगंगा घरोघरी' असं ब्रिदवाक्य मिरवणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील मराठी पदव्युत्तर अभ्यासक्रम कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) दिले आहेत. त्याचसोबत हिंदी अभ्यासक्रमही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या दहा वर्षांत विविध कारणं दाखवत मुक्त विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिक्षणविभागाच्या व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वायुनंदन आणि कुलसचिव दिनेश भोंडे यांच्याशी आम्ही संवाद साधला. यावेळी, आवश्यक शिक्षकवर्ग उपलब्ध नसल्यानं १० कोर्सेस बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं वायुनंदन यांनी म्हटलंय. तर, मराठी विषयावर अन्याय झाल्याची भावना कुलसचिव दिनेश भोंडे यांनी व्यक्त केलीय. 


गरीब, मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचलेलं हे विद्यापीठ या कारणामुळे आता वादात सापडलंय. अनेक विद्यार्थी नोकरी करून या विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. 


महत्त्वाचं म्हणजे, पुणे विद्यापीठासहीत इतर विद्यापीठांना एमए मराठीची सवलत देण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठातून मात्र मराठी वगळण्याचा आदेश यूजीसीनं दिलेत. त्यामुळे नुकताच 'कॉमन वेल्थ'चा 'एक्सलन्स पुरस्कार' मिळणाऱ्या या एकमेव विद्यापीठाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप केला जातोय.