पैशांसाठी टेम्पोचालक उमेशने असा रचला कट, पण पोलिसांनी केली अटक
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी उमेश कदम हा गुजरातच्या वापी येथे राहणार आहे.
स्वाती नाईक, झी २४ तास, नवी मुंबई : गुन्हेगाराने कितीही मोठा गुन्हा केला तरीही तो कायम पकडला जातो. गुन्हेगाराने स्वतःला कितीही हुशार समजलं तरीही पोलीस गुन्ह्याचा तपास लावतातच. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडलाय.
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरुन सेंट्रींगचे पाईप घेऊन ठाण्याच्या दिशेने जाताना दोघा लुटारुंनी चाकुचा धाक दाखवून लुटीचा प्रकार केला अशी खोटी तक्रार एका ड्रायव्हरकडून करण्यात आली. मात्र ज्यानी ही तक्रार केली, तोच खरंतर या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड होता.
टेम्पोसह सेंट्रींगचे पाईप्स लुटल्याचा बनाव करून टेम्पोतील माल भंगारात विकणारा टेम्पोचालक उमेश दगडु कदम याला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. पैशांची गरज असल्याने त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या टेम्पो चालकाने विकलेले पाईप आणि लपवून ठेवलेला टेम्पो हस्तगत केल्याची माहिती परिमंडळ-2चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी उमेश कदम हा गुजरातच्या वापी येथे राहणारा आहे. त्याला 29 एप्रिल रोजी पश्चिम बंगाल येथून सेंट्रींगचे पाईप ठाणे येथे पोहोचविण्याचे काम मिळाले होते. त्यानुसार त्याने आपल्या आयशर टेम्पोमध्ये सेंट्रींगचे पाईप भरुन तो ठाण्याच्या दिशेने येत होता. यावेळी त्याने 10 मे रोजी पहाटेच्या सुमारास टेम्पोतील माल ठाणे येथे नियोजीत स्थळी न नेता तुर्भे येथील एका भंगाराच्या दुकानात विकुन आपला टेम्पो गुजरातमधील पार्किंगमध्ये लपवून ठेवला.
त्यानंतर त्याने एक्सप्रेस मार्गावरुन टेम्पो घेऊन ठाण्याच्या दिशेने जात असताना, खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाईड असल्याचे भासवून टेम्पोत चढलेल्या दोघा लुटारुंनी ठाण्याजवळ आपल्याला चाकुचा धाक दाखवून टेम्पोसह सेंट्रींगचा माल लुटून नेल्याचा बनाव रचला.
त्यानंतर उमेश कदम याने ठाण्यातील कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कापुरबावडी पोलिसांनी अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा खांदेश्वर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चासकर आणि त्यांच्या पथकाने कळंबोली एक्सप्रेस वे पासून ते ठाण्यातील साकेत ब्रीज पर्यंतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. मात्र त्यात टेम्पो चालक उमेश कदम याचा टेम्पो निदर्शनास आला नाही.
त्यामुळे उमेश कदम याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला. यानंतर उमेश कदम याने पैशांची गरज असल्याने टेम्पो आणि त्यातील माल लुटून नेल्याचा बनाव रचुन खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली.
टेम्पोतील सेंट्रींगचे पाईप तुर्भे येथील भंगार विक्रेत्याला विकून टेम्पो गुजरातमधील पार्किंगमध्ये लपवुन ठेवल्याचेही सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भंगार विक्रेत्याकडून सेंट्रींगचे पाईप आणि गुजरात येथे लपवुन ठेवलेला टेम्पो हस्तगत केल्याचे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.
navi mumbai police arrested man who filed fake robbery complaint