Navi Mumbai Protest Uran Murder Case: नवी मुंबईमध्ये महिलांविरोधात वाढत्या अत्याचार प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये नवी मुंबईतील 29 गावांमधील नागरिक सहभागी झाले होते. काही आठवड्यांपूर्वी शिळफाट्या जवळील डोंगरामध्ये एका विवाहितेवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरण ताजं असतानाच उरणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 20 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली असून आता या वाढत्या गुन्हेगारीविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. नवी मुंबईमधील स्थानिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. नवी मुंबईमधील 29 गावांमधील ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन त्यांनी आरोपींना अटक करुन फाशी देण्याची मागणी केली आहे. 


दोन घटनांनी नवी मुंबई हादरली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात घोषणाबाजी करत हजारो ग्रामस्थ लाँग मार्चमध्ये सहभागी झाल्याचं आज सकाळी नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं. वाढत्या गुन्हेगारीविरोधात नवी मुंबईकर एकवटले आहेत.


शिळफाटा मंदिर परिसरात घडलेल्या घटनेबरोबरच उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी करत हे ग्रामस्थ एकवटले आहेत. 20 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. कोपरखैरणेबरोबरच वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चा काढण्यात आला. शिफळाटा प्रकरणामध्ये सामुहिक अत्याचार करणाऱ्या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नवी उरणमधील हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करुन त्याला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


नक्की वाचा >> दुपारी घरुन निघाली, साडेचारला मोबाईल बंद अन् पनवेल... उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं?


फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा खटला


नवी मुंबईत गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. उरणमध्ये तरुणीची क्रूर हत्या प्रकरणाबरोबरच आणि शिळफाटामधील बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नवी मुंबईकरांनी केली आहे. या लाँग मार्चमुळे आज सकाळी कोपरखैरणे ते वाशी मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता. हजारो ग्रामस्थ लाँग मार्चमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. उरणमध्ये महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला होता.


उरण प्रकरण काय?


यशश्री शिंदे नावाच्या 20 वर्षीय तरुणीवर वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ झुडपामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तिची हत्या तिच्याच ओळखीतील दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केल्याचा घरच्यांचा आरोप आहे. उरण पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करुन घेत दाऊद शेखला पकडण्यासाठी कर्नाटकमध्ये एक टीम पाठवली आहे. या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.