What Happened With 20 Year Old Uran Girl: नवी मुंबईमधील उरण येथे 20 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्यानंतर जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. नवी मुंबईमधील अनेक ठिकाणी आज हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी आज महिलांविरोधात वाढत्या अत्याचाराच्या प्रकरणांवर कारवाई करावी यासाठी मोर्चा काढण्यात आले. यामध्ये वाशी, उरणबरोबरच इतरही अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. मागील काही आठवड्यांमध्ये नवी मुंबईत महिलांविरोधातील गुन्हेगारीत वाढ झाली असून दोन गंभीर प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी एका प्रकरणात शिळफाट्याजवळील एका डोंगरावर विवाहितेवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आता पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र ज्या प्रकरणामुळे हजारो लोक रस्त्यावर उतरले ते प्रकरण आहे तरी काय? त्या तरुणीबरोबर नेमकं काय घडलं जाणून घेऊयात...
पनवेल रेल्वे स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. या तरुणीच्या मृतदेहावर अनेक वार करण्यात आल्याचं दिसून आलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास केला असता मृत महिलेचं नाव यशश्री शिंदे असं असल्याचं स्पष्ट झालं. यशश्री ही अवघ्या 20 वर्षांची होती. या तरुणीवर वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ झुडपामध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेतील मृत तरुणी यशश्री 25 जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती तिच्या मैत्रीणीच्या घरी गेलेली असं सांगण्यात येत आहे. तिथून ती पनवेल स्थानकाच्या दिशेने निघून गेली होती. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास यशश्रीचा मोबाईल बंद झाला. याच कालावधीमध्ये तिच्यावर वार करुन तिची हत्या करण्यात आली.
यशश्रीचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. यशश्रीच्या ओळखीतील दाऊद शेख यानेच तिची हत्या केल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. आरोपीला शोधून त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार उरण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दाऊद शेखला शोधण्यासाठी उरण पोलिसांचं एक पथक कर्नाटकला रवाना झालं आहे. आरोपीने मृत तरुणीच्या शरीरावर अनेक वार केले असून मृतदेहाची अवहेलना केल्याचा आरोप केला जात आहे. "राक्षसही असे नव्हते. दाऊद शेख गायब होता. त्याने षड्यंत्र केलं आणि तिची हत्या केली. या गुन्ह्याला शब्दात मांडता येणार नाही. फाशीची शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांना," अशी मागणी आज उरण येथील आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा >> आरोपींना फाशी द्या! नवी मुंबईत 29 गावचे गावकरी उतरले रस्त्यावर; जनआक्रोश मोर्चात हजारोंचा सहभाग
"रस्त्याच्या पलिकडे मुलीचा मृतदेह मिळून आला आहे. 302 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती बेलापूर येथे नोकरी करत होती. ज्या दिवशी हत्या घडली त्या दिवशी ती लवकर घरी आली होती. दुपारी साडेतीन ते चार दरम्यान तिच्याबरोबर हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी नक्की कोण आहे याबद्दलचा तपास करायचा आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.