नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे ३६ दिवसानंतर नागपूर विमानतळावर आगमन झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या स्वागतासाठी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते नागपूर विमानतळ परिसरात पोहोचले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमान चालीसा वाचणे म्हणजे राजद्रोह आहे का? असा सवाल विचारत राणा दाम्पत्य यांनी नागपूर रामनगर येथील प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांनी राणा दाम्पत्याला रॅली काढण्यास निर्बंध घातले आहेत. 


रामनगर येथील संकटमोचक हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य, त्यांचे समर्थक हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यासाठी येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नांना घेऊन त्याच ठिकाणी हनुमान चालीसा पठणाची भूमिका घेतली.


हनुमान चालीसा पठणावरून मंदिर परिसरात राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, मंदिरात नित्यनेमाने येणारे भक्त या सगळ्या राजकीय घडामोडीपासून दूर आहेत. हनुमानाच्या दर्शनाला कुणाचा विरोध नाही. मात्र, राजकीय व्यासपीठ म्हणून मंदिर परिसराचा वापर होऊ नये एवढीच इच्छा भक्तांनी व्यक्त  केली.


रामनगर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात अनेक राजकीय नेते नित्यनियमाने येत असतात. आजही या मंदिरात रामटेकचे भाजप माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी दर्शनासाठी आले होते. मात्र, त्यांनी या वादापासून दूर राहत हनुमानाचे दर्शन घेत आपल्या पुढील कामासाठी निघून जाणे पसंद केले.