`नवरा माझा नवसाचा 2`मध्ये `50 खोके`, `विरोधी पक्ष फोडण्या`चा उल्लेख; भारुड एकदा पाहाच
Navra Maza Navsacha 2 Siddharth Jadhav Bharud Video: सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील भारुड प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Navra Maza Navsacha 2 Siddharth Jadhav Bharud Video: 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्रासहीत देशभर प्रदर्शित झाला. तब्बल 20 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा चित्रपटाबद्दलचे रिव्ह्यू समाधानकारक आहेत. असं असतानाच सोशल मीडियावरही या चित्रपटाची चर्चा आहे. विशेष करुन या चित्रपटामध्ये पुढाऱ्याची भूमिका साकारलेल्या सिद्धार्थ जाधवने सादर केलेल्या पोवाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणरायाकडे भारुडाच्या माध्यमातून राजकीय हेतूने साकडं घालताना महाराष्ट्रातील राकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आलं आहे. या भारुडामधील काही शब्दांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत हे भारुड म्हणजे राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर केलेलं मार्मिक भाष्य असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
50 खोक्यांचा, पक्ष फोडण्याचा संदर्भ
चित्रपटामध्ये रेल्वेने प्रवास करत असतानाच या रेल्वे डब्ब्यातून प्रवास करणारा सिद्धार्थने साकारलेला नेता गणरायाला असं साकडं घालतो की इतरांना प्रश्न पडतो की हे नवस बोलत आहेत की धमकी देत आहेत? "देवा जर का तू मला पावला, सत्ताधारी खासदारकी लाभली मला, मुकूट घालीन 50 खोक्यांचा तुला," अशी ओळ या भारुडादरम्यान सिद्धार्थने साकारलेला नेता गणरायासमोर म्हणतो. 'हे वाक्य ऐकून, 'हे नवस बोलत आहेत की लाच देत आहेत?' असा प्रश्न स्वप्नील जोशीला पडतो. "जनतेचं भलं कराया, विरोधी पक्ष फोडाया, बुद्धी द्यावी गणराया," अशी मागणी सिद्धार्थ करतो. यावर सचिन पिळगावकर, "अशी बुद्धी गणराय देत नाही," असं म्हणतात. या संपूर्ण भारुडामध्ये सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी आणि अशोक सराफ यांनी केलेली शाब्दिक फटकेबाजीही उत्तम जमून आली आहे.
वारंवार पक्षांतर, कार्यकर्त्यांच्या अवस्थेवरही भाष्य
याच भारुडामध्ये कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यात धन्यता मानने, नेत्यांची मुलं आणि जवळचे नातेवाईकच राजकारणात यशस्वी होणे, नेत्यांनी वारंवार पक्षांतर करणे यासारख्या गोष्टींचे संदर्भ भारुडामध्ये अगदी उत्तम जुळून आणले आहेत. अनेकांनी या भारुडाचं सोशल मीडियावरुन कौतुक केलं आहे.
"भारूड, मस्त मांडलं आहे. पन्नास खोके, विरोधी पक्ष फोडले मस्त मांडलं आहे. सगळं चागलं कव्हर केलं आहे. खरं तर महाराष्ट्राची कलाकारांची परंपराच आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आमच्या कलाकारांनी, भारूड, पोवाडा, तमाशा, ओव्या, गीतांमधून जनप्रबोधन केलं आहे. आरसा दाखवलाय," असं अक्षय खोमाणे यांनी एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.
1)
2)
तुम्हाला कसं वाटलं हे भारुड कमेंट करुन नक्की सांगा.