मुंबई : आजपासून घटस्थापना, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. आजपासून नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात, देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. महाराष्ट्रभरात नवरात्रीचे हे नऊ दिवस उत्साह असतो. देवीची साडेतीन पिठं आता भक्तांनी फुलून जातील. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी, माहूलची रेणूका आणि वणीची सत्पशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करु लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मंदिरांसह राज्यतील आदिशक्तीच्या प्रत्येक मंदिरांत जागर, गोंधळ आणि गरब्याचा उत्सव रंगणार आहे.


अमरावतीच्‍या अंबादेवी मंदीरातही नवरात्र उत्‍सवाची लगबग सुरु आहे. दरवर्षी हजारो भाविकांच्‍या उपस्‍थितीने मंदिराचा परिसर फुलून जातो. 


५२ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि माता रुक्मिणीचे कुलदैवत असलेल्या श्री अंबादेवी मंदिराचा नवरात्रोत्सव भाविकांसाठी नेहमीच आनंददायी ठरतो. दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानाने विशेष काळजी घेतली आहे. 


दर्शनासाठी महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक तसेच शहर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.