गडचिरोलीमध्ये पोलीस दलाला मोठं यश, नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार
50 लाखांचं बक्षीस असलेला नक्षली कमांडर ठार झाल्याच्या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा
गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये मोठा नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मिलिंद तेलतुंबडेच्या हत्येनंतर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मिलिंद तेलतुंबडेची चकमकीत हत्या झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांची माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद तेलतुंबडेंवर 50 लाखांचं बक्षीस होतं. अखेर मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
गडचिरोलीतील कारवाईत 26 नक्षली ठार झालेत. धानोरा तालुक्यातल्या ग्यारापत्तीच्या जंगलात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये ही चकमक झाली. सकाळी पोलिसांच्या सी-60 पथकाचं शोध अभियान सुरू असताना लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्याला उत्तर देताना पोलिसांनी गोळीबार केला.
गोळीबारात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. तर नक्षलविरोधी पथकाचे 4 जवान जखमी झालेत. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात मोठं यश आलं आहे.