सरकारच्या निषेधार्थ जालन्यातील मंठा, आष्टी शहरात कडकडीत बंद
राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस पक्षाच्या वतीने मंठा,आष्टी शहरात कडकडीत बंद
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केला आहे. भाजपा सरकारने सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस पक्षाच्या वतीने मंठा,आष्टी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतोय.काल राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने मंठा आणि आष्टी शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
आज सकाळ पासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंठा आणि आष्टी शहरातुन रॅली काढून शहरातील दुकाने बंद केलीय रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत व्यापाऱ्यांना या बंद मध्ये सहभागी होण्याची विनंती केलीय.व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद करून बंदमध्ये सहभाग नोंदवत शंभर टक्के बंद पाळला आहे.
'तपासयंत्रणेला सहकार्य करणार'
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मी ईडीच्या कार्यालयात जाणार आहे आणि त्यांना संपूर्ण माहिती देणार आहे, तसंच त्यांचा पाहुणचारही घेणार आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. तपासयंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.
खडसेंकडून पाठराखण
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीदेखील शरद पवार यांची पाठराखण केली आहे. मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. सुरुवातीपासून या गैरव्यवहारात कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते, हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले, याबाबत खडसेंनी शंका व्यक्त केली.