Ajit Pawar on Ticket: भांडलात तर कानाखाली आवाज काढेन असा दम अजित पवारांनी (Ajit Pawar) मुळशीतील कार्यकर्त्यांना दिला आहे. तसंच वेळ आली तर टोकाचं वागेन अशा शब्दात त्यांना सज्जड दम भरला आहे. अजित पवारांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. लोकसभा आणि मनपा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची 8 लोकसभा मतदारसंघासंबंधी बैठक पार पडली. या बैठकीनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी मुळशीतील कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावत थेट कानाखाली लावेन असा इशाराच दिला आहे. 


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


"आपला जिल्हा 13 तालुक्याचा आहे. प्रत्येक तालुक्यामधून 10 वाहनं वर्धापनदिनासाठी आली पाहिजे. सभा भव्यदिव्य झाली पाहिजे. मुळशीच्या लोकांनीही काम करायचं आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिली आहेत. उगाच भांडायचं नाही, नाही तर सगळ्यांच्या कानाखालीच आवाज काढेन, बाकी काही करणार नाही. यातून तुमची नाही तर आमची बदनामी होते. शरद पवारांची बदनामी होती. हा कोणता फाजीलपणा सुरु आहे. पदाचा राजीनामा घेईन आणि फार टोकाचं वागेन," अशा शब्दांत अजित पवारांनी इशारा दिला आहे.


मुळशीत काय झालं होतं?


मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रसेचे पदाधिकारी सुनील चांदेरे आणि बाबा कंधारे यांच्यात मोठा वाद झाला होता. एका लग्नात दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. 


सुनील चांदेरे पुणे जिल्हा बँकेवर संचालक असून बाबा कंधारे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. दोघांमधे फार आधीपासून वाद आहे. हा वाद काही दिवसांपूर्वी चांगलाच चिघळला होता. बाबा कंधारेंनी सुनील चांदेरे यांच्या कानशिलात लगावली होती. यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आज स्वत: अजित पवारांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना दम भरल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान अजित पवारांनी दम भरल्यानंतर दोघेही पदाधिकारी बैठकीतून गायब झाले होते. 


"अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत"


विधानसभेचे माजी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं विधान केलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना संख्याबळ आपल्या बाजूने नाही तोवर काही शक्य नाही याची सर्वांना कल्पना असल्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. 



ते म्हणाले की "संख्या असल्याशिवाय तिथपर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वांना जाणीव आहे. त्यामुळे कोणी कितीही विधानं केली तरी अजित पवार, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, मला अशा सर्व प्रमुख नेत्यांना आगामी लोकसभा, विधानसभेत चांगली कामगिरी करायची आहे याची जाणीव आहे. त्यानंतर शरद पवार जो काही निर्णय घेता येतील तो सर्वांना मान्य असेल".