शिरूरमध्ये कोल्हे, लांडे की पाटील; राष्ट्रवादी उमेदवार निवडण्याच्या चक्रव्युहात
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीत चुरस पहायला मिळत आहे. विलास लांडेंचे भोसरीत उमेदवार म्हणून पोस्टर्स लागले आहेत. अमोल कोल्हेनी लांडेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे रणनीती ठरवत असताना शिरूर मतदारसंघात (shirur constituency) मात्र राष्ट्रवादीसमोरील (NCP) डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्या उमेदवारीला माजी आमदार विलास लांडे (vilas lande) यांनी आव्हान दिलंय. त्यामुळे आधीच आढळरावांसारख्या तगड्या उमेदवाराचं आव्हान असताना लांडे आणि कोल्हेंमध्ये राष्ट्रवादी तह कसा घडवून आणणार? उमेदवार निवडण्याच्या चक्रव्युहातुन राष्ट्रवादी पक्ष कसा बाहेर पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
'भावी खासदार' असे पोस्टर लागल्याने चर्चेला उधाण
राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीमध्ये लागेलेली ही पोस्टर्स म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या संघर्षाची नांदी तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. निमित्त ठरलं आहे ते लांडे यांच्या वाढदिवसाचं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेले माजी आमदार लांडे हे शिरूरमधलं तसं तगडं नाव. त्यामुळेच संसदेच्या प्रतिमेसह लांडेंचा फोटो असलेले 'भावी खासदार' अशी पोस्टर्स अख्ख्या शिरूरमध्ये लागल्यानं चर्चा तर होणारच! खुद्द लांडेंनीही याला दुजोराच दिला आहे.
प्रश्न नुसत्या पोस्टरचा नाहीये. शिरूरचे सध्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचेच आहेत. मात्र, लांडेंच्या महत्वाकांक्षेची पोस्टर्स अशी जाहीर लागतायत याला दादांचे आशीर्वाद नाहीतच असं तरी कसं म्हणयचं? म्हणूनच कदाचित डॉ. कोल्हेंनीही सावध पवित्रा घेत लांडेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या सूचक विधानानं शिरूरच्या उमेदवारीचं गूढ गहिरं झाल आहे. कोल्हेंचं कौतुक करतानाच जयंतरावांनी खास त्यांच्या स्टाईलनं आणखीही चांगल्या उमेदवारांचा उल्लेख केला आहे.
सगळेच गॅसवर!
एकूणच काय सगळेच गॅसवर! डॉ. अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर त्यांना माजी खासदार आढळराव पाटलांची टीका वेळोवेळी झेलावी लागली. यातूनच कधी डॉ. कोल्हे राजकारण संन्यास घेणार तरी कधी भाजपमध्ये जाणार अशा वावड्या उठत होत्या. म्हणूनच, लांडेंचं हे पोस्टररूपी शक्ती प्रदर्शन म्हणजे आधीच आढळराव पाटलांचं आव्हान त्यात स्वपक्षीयांकडूनच ताण, अशी कोल्हेंची स्थिती झाली असणार. त्यामुळे राष्ट्रवादीला इथं भाकरी फिरवायची झाल्यास चटका बसणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.