छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकवंलं खरं, पण आता पुढं काय करायचं या अडचणीत सापडले आहेत. मोठा राजकीय निर्णय घ्यायचा तर आहे. पण ठोस पर्याय सापडत नसल्यानं भुजबळ आता आहिस्ते कदम पुढं सरकू लागलेत. मुंबईत ओबीसी नेत्यांशी चर्चा करुन भुजबळ मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झालीय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळांनी नाशिकच्या समता परिषदेच्या मेळाव्यातून अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीकेचे बाण सोडले. आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचला, अजित पवारांवर मनमानीचा आरोपही केला. भुजबळांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची सगळी तयारी केली. राष्ट्रवादी सोडली तर पुढं काय याचं प्लॅन बी भुजबळांकडं दिसत नाही. त्यामुळंच भुजबळांच्या आक्रमकतेतली धार अचानक कमी झाली आहे. भुजबळांनी आता मौन धारण केलं असून ठोस पर्याय निवडल्यानंतरच भुजबळ आपली पुढची वाटचाल जाहीर करतील. पुढच्या वाटचालीबाबत भुजबळांनी नाशिकच्या सभेत आपल्या स्टाईलनं सांगितलं होतं.


कोणतेही ठोस पर्याय दिसत नसल्यानं आता भुजबळ राष्ट्रवादीकडून कोणी समजूत काढण्यासाठी येतो का त्याची वाट पाहत बसल्याचं सांगण्यात येतंय. सध्या त्यांच्यासमोर तीन राजकीय पर्याय आहेत. 


भुजबळांनी ओबीसींसाठी वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणे


छगन भुजबळांनी भाजपसोबत जाणे


राष्ट्रवादी आणि अजित पवारांशी जुळवून घेत आहे तिथंच थांबणे असे तीन पर्याय असल्याचं सांगण्यात येतंय.



भुजबळांनी अजित पवारांवर मनमानीचे आरोप केल्यानंतर आता अजित पवार भुजबळांची समजूत काढण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. अशावेळी भुजबळ स्वतः कोंडी फोडण्यासाठी काय करणार याकडं सगळ्या समर्थकांचं लक्ष लागलंय.