मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालन्यातील सभेत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. छगन भुजबळ मराठा नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. दरम्यान मनोज जरांगे यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. जरांगे आता कुणाचं खातोय तेसुद्धा त्यांनी सांगावं अशा शब्दांत त्यांनी टीकेला उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मराठा समाज इतका नादान, अशिक्षित आणि असंस्कृत नाही. मी त्यांचं म्हणजेच जरांगेंचं काय खाल्लं हे सुद्धा जरांगेंनी सांगावं. ते आता कुणाचं खात आहेत हेसुद्धा जरांगेंनी सांगावं. काय जरांगेंची परिस्थिती होती आणि आता काय आहे त्यांनी सांगावं. ते त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बोलतात. ती त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे. समाज सुसंस्कृत आहे. जे अचानक पुढारी झाले आहेत त्यांचा आरक्षणाचा अभ्यास, त्यांची संस्कृती, त्यांचं शिक्षण याचा परिणाम त्यांच्या भाषणावर होत असतो. त्यावर एवढं लक्ष देण्याचं कारण नाही. मी ही देत नाही तुम्हीही देऊ नका," असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. 


"सर्व पक्षाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते तेच म्हणत आहेत की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या. मी पण तेच म्हणतोय मग मला एकट्यालाच का टार्गेट करत आहेत?," अशी विचारणा भुजबळांनी केली आहे. 


"मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एक दोन नाही तर अनेक मेसेज आणि फोन येत आहेत. अनेकजण माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मी बोलायचा प्रयत्न केला तर मला ते चिडवणार, डिवचण्याचा प्रयत्न करणार हे मला ठाऊक आहे. मी 100 वैगेरे फोन ब्लॉक केले आहेत. तुझी वाट लावू, जिवंत राहणार नाही, शिव्यांचा वर्षाव हे सगळं सुरु आहे," अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. 


"सहकाऱ्यांनाही धमकीचे फोन आले, मेसेज आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. आता त्याचं काय करायचं पोलीस पाहतील. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाजकारण आणि राजकारणात आहे. जवळपास 57-58 वर्ष झाली. अनेकदा धमक्या आल्या, अडचणी आल्या, हल्लेही झाले. जनतेचे आशीर्वाद असतात. काम करत राहायचं. मी 90-91 मध्ये शिवसेना सोडली ती ओबीसीच्या मुद्द्यावर सोडली. तेव्हापासून ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे, टिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे यासाठी मी राज्यातच नाही देशभरामध्ये प्रचार, प्रसार करत आहे," असं भुजबळ म्हणाले. 


"ते मला हेदेखील सांगतात की मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं. त्यानंतर पुढे ते शिव्या देतात. मला मोठं केलं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा शाखाप्रमुख, नगरसेवक ते आमदार ते शिवसेनेचा नेता त्या संघटनेमध्ये झालो. इथे आल्यानंतर मराठा समाजानेही मदत केली. शरद पवारसाहेब, अजित पवार किंवा जयंत पाटील हे सर्व मराठा नेतेच होते ज्यांच्याबरोबर काम केलं. त्यांनी मला संधी दिली, मदत केली. माझाही काही उपयोग असेल म्हणूनच संधी दिली ना. असे अनेक ओबीसी कार्यकर्ते, नेते आहेत. माझं पण काहीतरी योगदान महाराष्ट्राच्या राजकारणात असेल. तुम्ही पक्षाला काही योगदान दिल्याशिवाय पक्ष तुम्हाला पुढे नेत नाही," असंही ते म्हणाले.