Sharad Pawar on Senetra Pawar: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याचं कारण बारामतीमध्ये सूनेत्रा पवार यांच्या कार्याचा आढावा देणारा चित्ररथ फिरताना दिसत आहे. यामुळे बारामतीत थेट  ननंद-भावजय यांच्यात लढत होऊ शकते. शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सूनेत्रा पवार लढतीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असून त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही असं स्पष्ट केलं. ते म्हणाले की, "लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर आम्ही तक्रार करण्याचं कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांसमोर मांडत राहायला हवी. 55-60 वर्षं आम्ही काय काम केलं हे लोकांना माहिती आहे". 


'पक्ष आणि चिन्हाचा निर्णय सेटलमेंट करुन घेतला'


"पक्ष आणि चिन्ह यांसंबंधी निवडणूक आयोग किंवा सभापतींनी जी भूमिका घेतली ती आम्हा लोकांवर अन्याय करणारी आहेत. पण पदाचा गैरवापर कसा होते ते यातून दिसत आहे. वरच्या कोर्टात जाणं हाच आमच्याकडे पर्याय होता. सुप्रीम कोर्टाला आम्ही निवडणूक जवळ असल्याने लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती करणार आहोत," अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. 


"पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं. सगळ्या देशाला राष्ट्रवादीची स्थापना, उभारणी कोणी केली हे माहिती आहे. पण हे माहिती असतानाही पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं हा अन्याय करणारा निर्णय आहे," अशी टीका शरद पवारांनी केली आहे. पुढे ते म्हणाले "अनेक लोकांनी जाहीर सभेतून आम्हाला नाव आणि चिन्ह मिळेल असा दावा केला होता. त्यामुळे हा सेटलमेंट करुन निर्णय घेतल्याचं दिसत आहे. अन्यायकारक निर्णय होईल याची आम्हाला कल्पना आली होती". 


अजित पवारांना प्रत्युत्तर


अजित पवारांनी बारामतीकरांना केलेल्या भावनिक आवाहनावर ते म्हणाले की, "आम्ही भावनात्मक आवाहन करण्याचं कारण नाही. बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्षं ओळखतात. त्यामुळे आम्हाला त्याची गरज नाही. पण ज्याप्रकारे यांच्याकडून भूमिका मांडली जात आहे त्यातून वेगळं सुचवलं जात आहे. जनता त्यासंबंधी योग्य निर्णय येईल याची मला खात्री आहे".


दरम्यान अजित पवारांनी आपल्याला एकटं पाडलं जात असल्याचा आरोप केला आहे. त्यावर ते म्हणाले की "निवडणुकीत मतदारांशी साथ जोडण्यासाठी त्यांनी हे केलं असावं. पण कुटुंबातील सर्व लोक एका बाजूला आणि मीच एकटा सांगणं आहे सांगणं म्हणजे सतत भावनात्मक भूमिका मांडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसत आहे". मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन येतात, दमदाटी केली जात आहे असं सांगितलं जात आहे. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच अशा गोष्टी होत आहेत अशी खंतही शरद पवारांनी व्यक्त केली.