Sharad Pawar on PM Modi Regular Maharashtra Visits: आगामी लोकसभा निवडणुका तसेच राज्यात या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांच्या आठावा बैठका, शिबिरे आणि दिल्ली दौरे वाढल्याचं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही महाराष्ट्रातील दौऱ्यांची संख्या वाटल्याचं चित्र दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईतील कोस्ट रोडचं उद्घाटन करण्यासाठी तसचे शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येणाऱ्याची शक्यता आहे. मागील महिन्यातही पंतप्रधान मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते. मोदींच्या हस्ते मुंबईतील ट्रान्सहार्बर सी लिंकचं उद्घाटनही करण्यात आलं होतं. मोदींचे महाराष्ट्रातील या झालेल्या व नियोजित दौऱ्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल पवार काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यांसंदर्भात भाष्य केलं. “लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील (महाराष्ट्रातील) दौरे वाढले आहेत. ही चांगली बाब आहे. महाराष्ट्रातील लोकांसंबंधी त्यांची आस्था वाढत असल्याचं दिसतंय," असं शरद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, "गुजरातला गेल्यानंतर ते (पंतप्रधान मोदी) काहीतरी देण्याबाबतचे औदार्य दाखवतात, तशी त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्याबरोबरच राज्यालाही आनंद होईल”, असा खोचक टोला लगावला.


महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल सूचक विधान


महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकींचं सत्र सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची घटक पक्षांमध्ये चर्चा सुरु असतानाच यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. “माझ्या सहकाऱ्यांनी मला महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली. या बैठकीमध्ये अतिशय चांगली चर्चा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे," असं पवार म्हणाले. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीतील सहभागासंदर्भात पवारांनी भाष्य केलं. "प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्यासाठी जो आग्रह केला, तो अतिशय योग्य आहे. एकत्र येऊन काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल. केवळ पक्ष एकत्र येऊन चालणार नाही. निवडणुकीत जागा जिंकणे हे महत्त्वाचं आहे. मात्र या जागा कशासाठी जिंकायच्या आहेत? कोणत्या कार्यक्रमावर त्या जिंकायच्या आहेत? यावर चर्चा झाली नाही तर नंतर मतभेद होतात. हेच मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा असून ती अगदी योग्य आहे,” असंही शरद पवारांनी म्हटलं.