नीरा : आपल्या देशात शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला जात नाही. शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. बारामती मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा निरा गावात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. मी सध्या निवडणूक लढवत नाही. मी वरच्या म्हणजे राज्यसभेत आहे. खालच्या सभागृहाच्या म्हणजे लोकसभेच्या भानगडीत आपण पडायचं नाही असं मी ठरवल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी अकलूजमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार फक्त साखर धंद्यात जास्त लक्ष देतात अशी टिका केली होती. याला पवारांनी उत्तर दिले आहे.  गेल्या ५० वर्षांत मी कुठल्या कारखान्याचा साधा संचालकही नाही. तरीदेखील माझा श्वास चालेपर्यंत मी या शेतकऱ्यांसाठी झटणार असे त्यांनी म्हटले आहे.  माझा पुतण्या सगळं बघायला लागलाय, माझ्या हातातील सत्ता गेली अशी टिका पंतप्रधान करतात. यात काय गैर आहे? मला त्यात आनंदच आहे. त्यांना मुलं ना बाळं त्यांना काय कळणार ? देशातील महत्वाच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी ते आमच्या कुटुंबावर टिका करत असल्याचे पवार म्हणाले. 



अमित शहांचं बारामतीत स्वागत असून आम्ही त्यांना मोकळ्या हातांनी पाठवणारच आहोत. आम्ही त्यांचा उत्तम पाहुणचार करू.  शाह गुजराती आहेत, त्यांना व्यवहार चांगला कळतो. त्यामुळे ते काहीतरी मुद्दा उपस्थित करतील पण आम्ही आमचा मुद्दा सोडणार नाही असे पवार म्हणाले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करता कारखानदारांचे कर्ज माफ करू असे शाह म्हणातात. त्यांची निती काय आहे ते यावरून कळत असल्याचेही पवार म्हणाले.