NCP Chief Sharad Pawar Viral Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे वयाच्या 80 व्या वर्षानंतरही एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या उत्साहाने सक्रीय असतात. त्यामुळेच पवार यांचा जनसंपर्क फारच दांडगा आहे. वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवारांची स्मरणशक्ती पाहून भलेभले आवाक होतात. अगदी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमधील मार्गदर्शन असो, पहाणी दौरे असो किंवा सभा असो पवार आजही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची ताकद असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. अनेकदा पवारांच्या या स्मरणशक्तीचा आणि दांडग्या जनसंपर्काचा अनुभव लोकांनी प्रत्यक्षात घेतला आहे. असाच काहीसा प्रकार रविवारी पुन्हा घडला तो जुन्नरमध्ये.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामधील जुन्नरमधील विघ्नहर सरकारी साखर कारखाण्यातील आसवणी, इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या उद्घाटन समारसंभासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनानंतर शरद पवार भाषणासाठी उभे राहिले. मात्र ते भाषण करण्यापूर्वीच समोर बसलेल्या गर्दीमधून पवारांच्या नावाने घोषणाबाजी झाली. पवारांनी एवढ्या गर्दीतून आलेला हा आवाज नेमका कोणत्या कार्यकर्त्याचा आहे हे अगदी थेट नावानीशी ओळखलं. त्यांनी थेट घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव घेत तूच आहेस ना असं विचारलं आणि हा सारा प्रकार पाहून उपस्थित थक्क झाले.


थेट नावचं घेतलं


'पवार साहेबांचा विजय असो...', 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो...' अशा घोषणा गर्दीतून ऐकू आल्या. हा आवाज ऐकून आल्यानंतर पोडियमवर माईक सरळ करणाऱ्या पवारांनी भाषणाला सुरुवात करण्याआधी आवाजाच्या दिनशेने गर्दीकडे बोट दाखवून 'कोंढाजी वाघ आहेत ना?' असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उपस्थितांनी होकारार्थी आरोळ्या दिल्या. त्यानंतर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. "सभा कुठलीही असली तरी आपले कार्यकर्ते घोषणा देतातच. हे जुन्नरचं वैशिष्ट्य आहे," असंही पवार पुढे म्हणाले. पवारांनी केवळ आरोळीच्या आवाजाने कार्यकर्त्याला नावासहीत ओळखल्याचं पाहून सर्वांनीच टाळ्या आणि शिट्यांनी पवारांच्या या जनसंपर्काचं कौतुक केलं.


रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ


रोहित पवार यांनी ट्वीटरवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. "आदरणीय साहेब तुमच्या लोकसंग्रहाला आणि स्मरणशक्तीला सलाम!" अशा कॅप्शनसहीत रोहित पवार यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 



या व्हिडीओवर कमेंट करताना एकाने, 'पवार साहेबांची स्मरणशक्ती बघता ते 100 वर्षांपर्यंत काम करतील,' असं म्हटलं आहे. पवारांची मेमरी फार उत्तम असल्याचं अन्य एकाने म्हटलं आहे.