मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना विधानपरिषदेचं तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या दोघांच्या नावाची ट्विटरवरून घोषणा केली आहे. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधानपरिषदेत उत्तम कामगिरी करतील, याची मला खात्री आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषद निवडणुकीच्या ९ जागांपैकी भाजपने ४, काँग्रेसने २ आणि राष्ट्रवादीने २ उमेदवारांची घोषणा केली आहे, तर शिवसेनाही दोन उमेदवार देणार आहे, त्यामुळे यापैकी कोणीच उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही. 


दुसरीकडे काँग्रेसने दुसरा उमेदवाार रिंगणात उतरवू नये, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. काल रात्री मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा केली. तर शरद पवार, संजय राऊत यांनीही थोरात यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी संपर्क केला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस दोन जागा लढण्यावर ठाम आहे. काँग्रेसने २ उमेदवारांची घोषणा केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये चिंतेचं वातावरण आहे. 


'महाविकासआघाडीचे ६ उमेदवार आहेत, त्यात काँग्रेसचे २ आहेत. माझ्यावर कोणताही दबाव नाही. ६ उमेदवार निवडून कसे येणार याचे नियोजन सुरू आहे', अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 


मुख्यमंत्री रिंगणात तरीही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, धोका कोणाला?


विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी?


विधानपरिषदेसाठी काँग्रेसने बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि  प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचं नाव जाहीर केलं आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित केलं असलं, तरी याची अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील या चौघांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.  


१४ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, तर २१ मे रोजी विधानपरिषदेसाठी निवडणूक होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार करण्यासाठी विधानपरिषदेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.