एकनिष्ठ राहण्यासाठी राष्ट्रवादीवर कार्यकर्त्यांना शपथ देण्याची वेळ
कार्यकर्त्यांची व्यक्त केली मनातील खदखद
नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पक्षामध्ये गटबाजी करणारे पांढरे हत्ती कुठवर पोसणार आहात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या ओहोटीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पक्षाशी तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देखील या कार्यशाळेत देण्यात आली.
आपल्या कार्यकर्त्यांना ही अशी शपथ देण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कठीण परिस्थिती ओढवली आहे. अशा वेळी आपल्या 'साहेबांना अखेरच्या श्वासापर्यंत' साथ देण्याची ही शपथ राज्यभरातून आलेल्या युवा नेत्यांना देण्यात आली. या शपथेकडे नकारात्मकतेनं बघू नका, ती सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
पक्षाचा चेहरा बनू पाहत असलेल्या खासदार अमोल कोल्हेंनी यावेळी कार्यकर्त्यांच्या अवघड प्रश्नांना सोयीस्कर उत्तरं दिली. पक्षातील तेच ते चेहरे पाहण्याचा वीट आला असल्याची भावना एका कार्यकर्त्यानं व्यक्त केली. त्यावर संकटात संधी शोधण्याचा सल्ला कोल्हेंनी दिला.
सध्या राष्ट्रवादीमधून जोरदार आऊटगोईंग सुरू आहे. अनेक नेते घाऊक पद्धतीनं साहेबांची आणि अजितदादांची साथ सोडत आहेत. याची छटा पुण्यातल्या कार्यशाळेत दिसली. अस्वस्थतेनं ग्रासलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न कोल्हेंसारखे तरुण नेते करत असले तरी कार्यकर्त्यांना शपथ देण्याची वेळ का आली, याचं आत्मचिंतन पक्षानं केलं पाहिजे.