नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जोरदार टोले लगावले. औरंगाबादमध्ये काल झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. याला उत्तर देताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आज सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत. सारख उदाहरण देतात उत्तर प्रदेशमध्ये योगींनी असं केलं, तसं केलं. पण त्यांनी केवळ मशिदीवरचे भोंगे बंद नाही केले. मंदिरावरचे लाऊडस्पीकरही तिथे बंद झाले.  


शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती असते. सुप्रीम कोर्टाने सकाळी सहा वाजता माईक सुरु करायला सांगितला आहे. यासंदर्भात कोणीही हरकत घेतली नाही. आपल्याकडे रात्रीचा जागरण, गोंधळ किती वाजता असतो, उद्या जर फतवा काढायचा म्हटलं तर दहा वाजता बंद करावं लागेल. त्याला कोण जबाबदार आहे असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.


हरिनाम सप्ताह रात्रीचा असतो, वेगवेगळ्या प्रकारचे किती तरी कार्यक्रम असतात, आपल्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या जत्रा, उरुस सुरु आहेत. यात काही सांस्कृतिक कार्यक्रम रात्रीचेच असतात. पोलीस त्यात हस्तक्षेप करत नाही. जोपर्यंत संमतीने सुरु आहे तोपर्यंत आपण त्याकडे डोळेझाक करतो, असं असताना वातावरण खराब करण्याचं काम सुरु आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला. 


राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात डिझेलबद्दल पेट्रोल, गॅसच्या वाढत्या किंमतीबद्दल काही सांगितलं. आम्ही आया-बहिणींना गॅस सिलेंडर स्वस्तात मिळावा यासाठी हजार कोटी रुपयांचा टॅक्स कमी केला. पण वरुन किंमतीत वाढच होतेय माझ्या शेतकऱ्याच्या शेतातील उस अजून जायचा बाकी आहे, त्याबद्दल ते काय बोलले अशी टीका राज ठाकरेंवर केली.


सकाळपासून शरद पवार, छगन भुजबळ, मी सभा घेत सुटतो, यांची सभा कधी तर संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर जरा हवा सुटल्यानंतर बाबाची सभा सुरु होते.  कधी दुपारी दोनची सभा यांची ऐकली आहे का, कधी कष्ट घेतले आहेत का, असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला.


फक्त लोकांची दिशाभूल करायचं काम करायचं, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. सध्याचं राजकारण एका विचित्र दिशेने जाताना दिसंतय याची खंत महाराष्ट्रातल्या नागरिकांना आहे. राजकीय स्वार्थापोटी ही मंडळी समाजा-समाजात दरी पाडण्याचं काम जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर ज्यांनी फक्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्याकरता केला, ती मंडळी आज शरद पवारांना विचारतायत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराजांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नावच फक्त शरद पवार घेत नाहीत, तर त्यांच्या विचारांवर चालण्याचं काम शरद पवार करतात. 


छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयामध्ये, रक्तात आहेत, श्वासात आहेत, ध्यासात आहेत, आमच्या नसानसात आहेत. 


हा कोण तुकडोजी राव आम्हाला विचारतो शिवाजी महाराजांबद्दल. यांची भाषणं म्हणजे काय, यांची नक्कल कर, त्यांची नक्कल कर, हा नकलाकार आहे की भाषणकार आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.