त्यावेळी काय घडलं होतं ? धनंजय मुंडेंनी सांगितली पूर्ण कहाणी
यासर्वांबद्दल धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय.
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आणि तक्रार केलीय. यानंतर धनंजय मुंडे यांनी तात्काळा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हे आरोप फेटाळून लावलेयत. रेणू शर्मा हे प्रकरण नेमकं काय आहे ? त्यावेळी काय घडलं होतं ? यासर्वांबद्दल धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय.
हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती असे मुंडे म्हणाले. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिल्याचेही ते म्हणाले.
2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. माझ्या जिवाला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा आल्याचे मुंडेंनी पुढे म्हटलंयय या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. याबाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आल्याचे ते म्हणाले. रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएसरुपी पुरावे असल्याचे मुंडेंनी म्हटलंय.
तक्रार मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली आपल्यावर २००६ पासून अत्याचार सुरु होते असं तिने तक्रारीत म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी झी २४ तासकडे यासंदर्भात खुलासा करत सर्व आरोप फेटाळलेयत. हे आरोप खोटे असून बदनामी करणारे आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा दावा मुंडे यांनी केलाय.
धनंजय मुंडे यांनी माझ्याशी इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. तुला बॉलिवूडमध्ये मोठ्या निर्मात्यांशी भेट घालून देईन आणि काम मिळवून देईन असे आश्वासन दिले असा आरोप रेणूनं केलाय.
कोण आहे रेणू शर्मा ?
रेणु शर्मा ही बॉलिवूड गायिका आहे. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ती 1997 साली आपल्या इंदौरच्या घरी धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा भेटली होती. 1998 साली धनंजय मुंडे यांनी बहिण करुणा हिच्याशी लग्न केल्याचे रेणूचं म्हणणं आहे. लग्नाच्या बहाण्याने आपल्या बहिणीशी शारीरिक संबध ठेवल्याचा आरोप तिने केलाय. धनंजय मुंडेंनी 2012 मध्ये एनसीपीमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप नेत्यांकडे मदतीची साद
या तरूणीने पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली आहे.