भाजपचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम हे फक्त मतांपुरतचे - जयंत पाटील
कर्नाटक राज्यात छत्रपतींचा पुतळा रातोरात हटवल्याच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीने केला तीव्र निषेध
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम फक्त मतांपुरते असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. बेळगावात कर्नाटक सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. जयंत पाटील यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला. यावरून भाजपचे शिवाजी महाराजांविषयीचे बेगडी प्रेम दिसून आले.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदार पदाची शपथ घेताना शिवाजी महाराजांचा जयघोष केला तेव्हा काय घडले हे आपल्याला माहिती आहे. भाजपच्या मनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत द्वेष का आहे ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
काय आहे वाद?
बेळगावच्या मनगुत्ती गावात शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक ग्रामपंचायतीनेही यासाठी आवश्यक परवानगी दिली होती. मात्र, गावातील एका गटाचा या पुतळ्याला विरोधा होता. त्यामुळे पोलीस पुतळा हटवण्यासाठी आग्रही होते. अखेर मनगुत्ती गावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी नरमाईचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे हा वाद शमला, असे वाटत होते.
मात्र, यानंतरही कर्नाटक सरकारने रातोरात हा पुतळा हटवला. गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून हा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे