#MumbaiRains : मलिष्काला दौऱ्यावर नेणाऱ्यांना आमच्यासोबत बैठकही घ्यावीशी वाटली नाही- जितेंद्र आव्हाड
गरीब जनता नको, आमदार नको?
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शुक्रवारपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरीय परिसरात राहणाऱ्या जनतेची तारांबळ उडवली आहे. सोमवारी रात्रीपासूनच पावसाचा दोर वाढला आणि त्यानंतर संपूर्ण मुंबई जलमय झाली. बऱ्याच सखल भागांमध्ये, घरांमध्ये पाणी साचलं. पण, ही परिस्थिती नेमकी का ओढवली हाच प्रश्न पुन्हा एकदाच उपस्थित होत आहे.
सर्वत्र पावसामुळे उदभवलेल्या या अडचणीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही मागे राहिलेले नाहीत. नवाब मलिक यांच्या घरी पावसाचं पाणी साचल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
'मलिष्काने गाणं तयार केलं, मुंबई तुला माझ्यावर भरवसा नाही का? त्यामुळे मलिष्का नशीबवान आहे, तिला महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी घेऊन नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यावर घेऊन गेले. आम्ही कित्येक वर्षे इथे ओरडतोय आमच्या सोबत एखादी बैठक घ्याव्याशी अधिकाऱ्यांना वाटली नाही', असा नाराजीचा सूर त्यांनी आळवला.
नालेसफाईनंतर कचरा नाल्याच्या काठावर टाकला जातो, ठेकेदाराला कितीही सांगितले तरी तो उचलला जात नाही हा मुद्दा अधोरेखित करत रस्त्यावरील हाच करचा पुन्हा पाण्यात जात असल्याचं वास्तव त्यांमी सर्वांसमोर ठेवलं
'नवाब मालिकांच्या घरात पाणी घुसलं. ते पुन्हा घर उभं करतील पण ज्या गरीबाच्या घरात पाणी घुसलं तो उध्वस्त होतो. अशा गरिबांच्या घरी मलिष्काला घेऊन जात का? तुम्हाला मलिष्का लागते, गरीब जनता नको, आमदार नको?', अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी मुंबई - ठाण्यातील आमदारांना घेऊन बैठक घ्यावी अशी मागणी केल्याचंही ते म्हणाले. वरळीतील सर्वात मोठा नाला ओंकार बिल्डरने अर्धा बंद केला, तरी अद्यापही त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. उलटपक्षी मुंबईतील सर्व नाले बिल्डरने लहान केले आहेत असा आरोप आव्हाड यांनी केला.