#सातारा_सभा_वर्षपूर्ती : शरद पवारांनी सगळे पैलवान उभ्यानं लोळवले तेव्हा....
गोष्ट ८० वर्षांच्या योद्ध्याची....
मुंबई : महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील राजकारण कोळून प्यायलेला नेता म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. राजकीय वर्तुळात अतिशय मानाचं स्थान असणाऱ्या शरद पवारांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी कायमच आपल्या निर्णयांनी आणि वावरानं सर्वांनाच थक्क केलं. साधारण वर्षभरापूर्वीही त्यांनी अशीच किमया केली होती. ज्याचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत पाहायला मिळाले होते.
एकिकडे शरद पवार राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी दौऱ्यासाठी गेलेले असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून सोशल मीडियावर एक लक्षवेधी व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये साताऱ्यातील भर पावसात झालेल्या त्या सभेचे काही क्षण पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ पाहून भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करुन दाखवणाऱ्या शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा सर्वांनाच हेवा वाटत आहे.
'त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते.
त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती.
ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला.
जनता चिंब भिजली
दिल्ली मात्र थिजली', असं लिहित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये पवारांना मिळालेला जनमानसाचा आशीर्वाद नेमका कसा होता, याचीच डोळे दीपवणारी झलकही पाहायला मिळत आहे.