औरंगाबाद: कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे भास्कर जाधव शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी शिवसेनेकडून विशेष लगबग सुरु असल्याचे दिसून आले. भास्कर जाधव यांना आजच आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करायचा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भास्कर जाधव आपला राजीनामा सचिवांकडे देऊन तो विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फॅक्सने पाठवून त्यांची स्वाक्षरी घेता आली असती. परंतु यात खूप वेळ जाण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेने भास्कर जाधव आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना विशेष व्यवस्था करून एकत्र आणले. 


भास्कर जाधव हे रत्नागिरीत होते. उद्धव ठाकरे यांनी खास विमानाची व्यवस्था करून त्यांना औरंगाबादला नेले. याठिकाणी त्यांना लवकरात लवकर आमदारकीचा राजीनामा देता यावा म्हणून हरीभाऊ बागडेही चक्क मोटारसायकलवर आल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा हातोहात मंजूरही केला. 


यानंतर भास्कर जाधव पुन्हा विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. ते दुपारी दोन वाजता शिवसेनेत प्रवेश करतील. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.


भास्कर जाधव हे मुळात शिवसैनिक. मात्र, काही कारणामुळे वाद झाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अपक्ष निवडणूक लढविली. त्यांना यश आले नाही. मात्र, त्यांनी शिवसेनेला आपली ताकद दाखवून दिली होती. त्यांना मिळणारा पाठिंबा पाहून खुद्द शरद पवार हे चिपळूणमध्ये गेले. त्यांच्या उपस्थितीत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाधव यांचे महत्व वाढले होते. त्यांनी आधी चिपळूणमधून राष्ट्रवादीला आमदार दिला. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना झाली. यानंतर गुहागरमधून निवडणूक लढवत राष्ट्रवादीला यश मिळवून दिले. ते गुहागरचे विद्यमान आमदार होते.