सोलापूर : मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे विद्यमान यशवंत माने यांचे दोन जातीचे दाखले असून त्यांनी बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना तत्कालीन उमेदवाराचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. याबाबत त्यांनी आमदार यशवंत माने यांचे दोन्ही दाखले यावेळी पत्रकार परिषदेत सादर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलडाणा जिल्ह्यात कैकाडी समाज हा SC मध्ये गणला जातो. त्यानुसार यशवंत माने यांच्याकडे SC चे जात प्रमाणपत्र आहे तर पुणे जिल्ह्यात कैकाडी समाज हा VJ विमुक्त वर्गात येतो. त्यामुळे आमदार माने हे मागील १०० वर्षापासून इंदापूर तालुक्यात राहत असून त्यांनी बुलडाण्यातून SC वर्गाचा जातीचा दाखला दाखल करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केलीय.


आमदार माने यांचा कैकाडी समाजाचा इंदापूरमधील शेळगावचा दाखला हा VJ विमुक्त वर्गातील असून १९८५ साली त्यांनी हा दाखला काढला होता तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमधून त्यांनी SC चा दाखला काढून त्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्याचा दावा तक्रारदार सोमेश क्षीरसागर यांनी यावेळी केला. 


याबाबत बुलडाणा जातपडताळणी कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये देखील फिर्याद दिल्याचा दावा सोमेश क्षीरसागर यांनी केलाय.


दरम्यान या आरोपाबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने यांना विचारले असता, क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपाबद्दल मला फार काही बोलायचे नाही. त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करु द्या. मी यावर काही प्रतिक्रिया देणार नाही अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे जातपडताळणी विभाग या तक्रारीची दखल घेतोय का हे पाहणे महत्वाचे ठरणाराय..