Amol Kolhe : मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असतं असे सूचक विधान शिरुरचे लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा सुरुय. त्यामुळे ते भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व चर्चांवर आता अमोल कोल्हे यांनी सूचक विधान केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांसद प्रवास योजनेंतर्गत शिरूर लोकसभा मतदार संघाचा (shirur lok sabha constituency) दौरा केल्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान केलं होते. पटेल यांच्या या विधानानंतर अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधानानंतर आणखी संभ्रम वाढलाय.


काय म्हणालेत अमोल कोल्हे?


"मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्यामुळे ही गोष्ट मला पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असतं. निवडणूक अजून खूप लांब आहे, आताच पक्षांतर आणि नाराजी या गोष्टींच्या चर्चा करण्यात काहीही तथ्य नाही. अकारण बुद्धीभेद करण्याचा हा प्रयत्न विकासाच्या वाटेपासून दूर नेणारा आहे, मला त्यात रस नाहीये," असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.


अमोल कोल्हे यांना गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून वगळण्यात आल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. तसेच याआधी अमोल कोल्हे यांनी त्यांच्या गरुडझेप चित्रपटानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीबाबत नाराजी आणि भाजपसोबत जवळीक निर्माण होत असल्याची चर्चा सुरु झालीय.