मुंबई: परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वेगवेगळ्या चौकशांचं सत्र सुरू झालं. त्यातचं आता अनिल देशमुखांच्या घरावर EDने छापेमारी केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली. मुंबई आणि नागपूरच्या घरावर ईडीनं धाड टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित पाच ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सध्या तिथे तपास सुरू असून अनिल देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या अनुषंगाने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हाच गुन्हा आता ED मनी लॉडरिंगच्या अनुषंगाने तपास करत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार याआधी अनिल देशमुख यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी धाडी टाकण्यात आल्या होत्या. 25 मे रोजी अनिल देशमुखांशी संबंधित नागपुरातील तिघांकडे ईडीने चौकशी केली होती. आता अनिल देशमुखांना आज अटक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


याच धाडसत्रावरून आता राज्याचं राजकारण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुखांच्या घरावर छापेमारी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर जोरदार टीका केली. 


भाजपकडून सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला. तर राज्यात अनेक प्रश्न असताना चुकीच्या गोष्टी सुरू असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय तर भाजपकडून एजन्सीचा गैरवापर होत असल्याचं जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी म्हटलं आहे.