Supriya Sule on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल (Prafull Patel) यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमल्यानंतर आता अजित पवारांनी आपल्याला पक्षकार्याची संधी देण्याची विनंती केली आहे. शरद पवारांसमोरच त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. ‘‘विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या’’, अशी विनंती त्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांना अजित पवारांच्या या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, "अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे. दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय आहे. मला मनापासून आनंद हे की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमधे उत्साह संचारला आहे. दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. पण माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बहिण म्हणून माझी इच्छा आहे". 


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी अजित पवारांनी आपल्याला आता विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘‘विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती. पण, आमदारांचा आग्रह आणि त्यांनी स्वाक्षऱ्या गोळा केल्याने ते पद स्वीकारले आणि गेले वर्षभर काम केले. मात्र, आता हे पुरे झाले, पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या’’. या कार्यक्रमात शरद पवारांसह, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ असे नेते उपस्थित होते. 


मोदी महाराष्ट्र मिशनवर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, "त्यांना आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, त्यांनी दर महिन्याला महाराष्ट्रात खुशाल यावं. त्यांचं स्वागतच आहे". नरेश म्हस्के यांच्यावर बोलताना तर कोण कोणाला कॉपी करतंय हे सर्वांना ठाऊक आहे. शासन आपल्या दारी हा प्रोग्राम आज आलाय, याआधीचे आमचे उपक्रम तुम्हीच बघा असा टोला त्यांनी लगावला. 


फडणवीस यांचा या सरकारमध्ये सातत्याने अपमान होत आहे. सरकारकडून अपमान केला जात आहे असं त्यांनी म्हटलं.