`आम्हाला घाबरवून...`, अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Supriya Sule on Anil Deshmkh: शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांना असं वाटत आहे की, ते आम्हाला घाबरवू शकतात. पण आम्ही घाबरणार नाही अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी गुप्तचर विभाग झोपला होता का? अशी विचारणाही केली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
"एका सशक्त लोकशाहीत पारदर्शकपणे निवडणूक झाली पाहिजे. ज्याप्रकारे अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. शांततेच्या मार्गाने सर्वजण प्रचार करत होते. हा हल्ला झालाच कसा? सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. हा अन्याय आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर, लोकांवर असा हल्ला होणं दुर्दैवी आहे. सशक्त लोकशाहीत हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांना आम्हाला घाबरवू शकतात असं वाटत आहे. पण आम्ही घाबरणार नाही," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पुढे त्यांनी सांगितलं की, "माझं त्यांच्या सूनेशी बोलणं झालं. संपूर्ण कुटुंब घाबरलं आहे. ा भाजपाने आणि त्यांच्या मित्रपक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे?".
"सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे? 50 वेळा सगळ्यांचे हेलिकॉप्टर, गाड्या तपासत आहेत. त्यात यांना काही मिळालं नाही. मग हल्ला झाला तेव्हा सरकार करत होतं. गृहमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल," असंही त्या म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळेंची पोस्ट -
प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
नेमकं काय झालं?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख जी नरखेड येथील सांगता सभा आटपुन काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचा करिता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांच्या गाडीसमोरील काचेवर एक मोठा दगड पडल्याचा दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. माहितीनुसार गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काच फुटली आणि त्या काचेचे तुकडे समोर बसलेल्या अनिल देशमुखांच्या डोक्याला लागले.