वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : देहू इथं संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात आधी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण केलं नाही. यावरुन बरचं राजकारण रंगलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांनी भाषण करणं अपेक्षित असताना त्यांना वंचित ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आणि राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. जळगावमध्येही राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने आंदोलन केलं. हे आंदोलन करताना हातात बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पण यावेळी एका गोष्ट मात्र आंदोलकांच्या लक्षातच आली नाही. आणि नेमकी हीच गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे.


अजित पवारांचं देहू येथील कार्यक्रमात भाषण झालं नाही. याचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावात राष्ट्रवादीच्या महानगर महिला आघाडीनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांच्या हातातील बॅनरवर देहू ऐवजी चक्क जुहू (मुंबई) असा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे आंदोलन करणाऱ्यांपैकी एकाच्याही ही गोष्ट लक्षात आली नाही.


उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिसाच्या ही चूक लक्षात आली. यानंतर कुठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भानावर आले. त्यांनी बॅनर गुंडाळून ठेवला आणि नुसती घोषणाबाजी करून आंदोलनाचा सोपस्कार पार पाडला.


 देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही म्हणून महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांना, देहू आणि जुहूतला फरक कळू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय.