मुंबई : Coronavirus साऱ्या जगाला संकटात टाकून अगदी वेगाने फोफावत असतानाच आता त्याचे थेट परिणाम हे जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येऊ लागले आहेत. एकिकडे कोरोनावर मात कशी करायची हा प्रश्न असतानाच भारतासह अनेक राष्ट्रांपुढे आव्हान आहे ते म्हणजे मंदावलेल्या आर्थिक चक्राला पुन्हा गती देण्याचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचं चित्रही सध्या काही वेगळं नाही. याच परिस्थितीचा आढावा घेत आता अनेक राजकीय नेतेमंडळींनी सरकारला सल्ले देत या वित्तीय संकटातून कशा प्रकारे तरुन जाता येईल यासाठी जणू मार्गच दाखवण्यास सुरुवात केली आहे. यातच आता महाराष्ट्रातील एका युवा नेत्याची भर पडली आहे. हे नाव म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं. 


सोशल मीडियावर सातत्याने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यक्त होणाऱ्या रोहित पवार यांनी केंद्राला आणि राज्याला अनुसरून काही ट्विट केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी नोकरभरती रद्द करण्यापेक्षा सरकारने एका वर्षासाठी मोफत सेवा किंवा किमान वेतन तत्त्वाचा मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला. असं केल्यास युवांना नोकरी, सरकारला मनुष्यबळ मिळेल असा विश्वासही व्यक्त केला. 






लॉकडाऊनचा कालावधी हळूहळू शिथिल होण्याच्या वाटेवर असतानाच अनेक स्थलांतरित मजुर हे त्यांच्या राज्यात परतत आहेत. त्यामुळे सहाजिकच याचा बोजा उद्योग आणि व्यवसायांवर येणारय पण, या परिस्थितीकडे मराठी मुलांनी संधी म्हणून पाहत त्याचा फायदा घ्यावा असा पर्याय त्यांनी सुचवला. 


 


कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नका, असा सल्ला देत त्यांनी या ट्विटच्या शृंखलेतून कापूस खरेदीच्या मुद्द्यावरही प्रकाशझोत टाकला. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींविषयी त्यांनी केंद्रालाही सल्ला दिला. तर, दिल्लीप्रमाणेच दारुवर कराचं प्रमाण वाढवण्याचीही विचारणा केली. एकंदरच चौफेर विचार करत या युवा नेत्याने दिलेले हे सल्ले पाहता पुन्हा एकदा कोरोनाच्या या संकटात अर्थव्यवस्थेबाबतही सर्वजण सजग असल्याचंच स्पष्ट होत आहे.