रिव्हर्स गिअरसहीत बजाजची नवी कोरी `चेतक` पुण्यात!
२० `चेतक`स्वारांनी उत्तर आणि पश्चिम भारताचा ३००० किमीहून अधिकचा प्रवास करत पुण्यापर्यंतचा टप्पा गाठला
कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी-चिंचवड : बजाज ऑटोसाठी अभिमानस्पद ठरलेली आणि भारतातल्या लोकांचे स्टाईल सिम्बॉल ठरलेली 'चेतक' आज पुण्यात नव्या ढंगात सादर करण्यात आली. ही नवी चेतक इलेक्ट्रिक म्हणजेच बॅटरीवर चालणार आहे. काही दशकांपूर्वी बजाजची चेतक घरात असणे म्हणजे अभिमानाची गोष्ट समजली जायची. चेतक मिळवण्यासाठी काही वर्षांची वेटिंग असायची. 'बजाज'साठी तर 'चेतक' म्हणजे ओळख... आता तीच चेतक बजाजने पुन्हा ग्राहकांच्या सोयीसाठी रिलॉन्च केलीय.
या नव्या चेतकचं पुण्यात सादरीकरण करण्यात आलं. बॅटरीवर चालणारी नवी चेतक नवी दिल्लीमध्ये १६ ऑक्टोबर २०१९ रोजी चेतक सादर करण्यात आली होती. या कार्यक्रमात नवी दिल्लीतून सुरू झालेल्या चेतक इलेक्ट्रिक यात्रेला रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता.
२० चेतकस्वारांनी उत्तर आणि पश्चिम भारताचा ३००० किमीहून अधिकचा प्रवास करत पुण्यापर्यंतचा टप्पा गाठला. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी पुण्यात पोहोचण्याआधी हा ताफा दिल्ली ते आग्रा, जयपूर, उदयपूर, चित्तोडगडमधील चेतक स्मारक, अहमदाबाद, मुंबई, पणजी असा प्रवास करून आला आहे.
आज आकुर्डी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये या यात्रेचे स्वागत करण्यात आलं. अगदी सहजपणे कुठे ही चार्ज करता येणारी, अत्यंत आकर्षक असलेली नवी चेतक नक्की ग्राहकांचे मन जिंकेल, असा विश्वास राजीव बजाज यांनी व्यक्त केलाय.
चेतकचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला 'रिवर्स गिअर' देण्यात आलाय. त्यामुळे पार्किंगमधून गाडी काढताना खासकरून मुलींना त्याचा फायदा होणार आहे. या नव्या कोऱ्या 'चेतक'ची किंमत अजून सांगण्यात आली नसली तरी जुन्या 'चेतक'प्रमाणेच या चेतकला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास बजाज यांनी व्यक्त केलाय.
येत्या जानेवारीमध्ये पुण्यात ही नवी 'चेतक' थेट ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर ती बंगलोरला उपलब्ध होणार आहे. 'बजाज'च्या जुन्या 'चेतक'ने भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता ही नवी चेतक ग्राहकांना किती पसंत पडते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.