आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : न्यू इअर सेलिब्रेशनची तयारी करतायत... तर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक खास डेस्टिनेशन... ज्याठिकाणी तुम्हाला निवांतपणा पण मिळेल आणि पर्यटनासोबत खवय्येगिरीचाही आनंद घेता येईल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरी धकाधकीला कंटाळला आहात... जरा निवांतपणा हवाय... न्यू इअर जरा हटके साजरा करायचाय... तर चंद्रपूरच्या दुर्गम तालुक्यातल्या विहिरगाव रस्त्यावरच्या चनाखा शेतशिवाराचा अनुभव घ्यायला चला... 


या कृषी पर्यटन केंद्रात येणा-या पर्यटकांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जातं...त्यानंतर तुम्हाला सुरू होते ती खास ग्रामीण बाजाचा अनुभव देणारी मालिका... मातीच्या पेल्यातून लिंबू सरबत असतं वेलकम ड्रिंक... लगोलग घेता येतो तो शिवार फेरीचा आनंद... त्यात पर्यटकांना शेतपिकांची संपूर्ण माहिती दिली जाते... या फेरीदरम्यान शेतातल्या झाडाच्या सावलीत बसून ग्रामीण भागाची खास ओळख असलेला कच्चा चिवडा, शेतातले पेरु, बोरं, शिंगाडे, झाडावर पिकलेली केळं असा मेनू असतो...याशिवाय खास ज्वारीचा हुरडा म्हणजे क्या बात... त्यासोबत दिलं जातं ते वांग्याचं भरीत...मिरचीचा ठेचा...ताक आणि गूळ... 


खास ग्रामीण खेळांचा आनंद देखील याठिकाणी लुटता येतो... रस्सीखेच, विटीदांडू, गोट्या, लगोरी, पतंग, घानमाकड म्हणजे सी-सॉ, अशटू-चंदा यासारखे विस्मरणात गेलेले खेळ खेळता येतात...हे खेळ खेळून मोठ्ठी माणसं देखील आपल्या बालपणात रमून जातात... 


खेळून दमल्यावर मग वेध लागतात ते जेवणाचे... त्यासाठी देखील खास बेत आखलेला असतो आणि तो देखील चुलीवरच्या जेवणाचा... वांग्याची भाजी, पिठलं-भाकरी आणि गोड-वरण असा हा बेत असतो...


एकीकडे पर्यटक खेळांचा आनंद घेतात तर दुसरीकडे काही पर्यटक गप्पा मारत, सेल्फी काढत आणि शेतात फेरफटका मारत आपला वेळ घालवतात. विशेष म्हणजे याठिकाणी पर्यटकांना आपल्या हातानं भाजी खुडण्याचा आनंद घेता येतो...


चनाखा गावाशेजारच्या 15 एकर पडित शेतीत आसेकर दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मित्रांनी आधुनिक पद्धतीनं शेतीला सुरुवात केली आणि सोबतच या शेतीला कृषी पर्यटनाचीही जोड दिली


आजकालची पिढी शेतीत राबत नाही अशी टीका केली जाते. मात्र 'एक मोकळा श्वास ' च्या युवा शेतक-यांनी उभा केलेला प्रकल्प पर्यटकांच्या पसंतीला उतरलाय. शहरी धकाधकीला कंटाळलेल्या नागरिकांच्या 'गावाकडच्या ओढीचं ' मर्म आणि जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केलेली खटपट यामुळे या कृषी पर्यटन केंद्रात लोकांचा पूर्ण दिवस कापरासारखा उडून जातो. फक्त सुट्टी एन्जॉय करण्याच्या पलीकडे हे कृषी पर्यटन  केंद्र इथं येणा-या लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देतंय आणि मनाच्या कप्प्यात साठविण्यासाठी आभाळभर आठवणीही.