कोकण रेल्वेच्या प्रवाशांना डबलडेकरमध्ये नव्या सुविधा : रेल्वे बोर्ड
प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि प्रोजेक्ट सक्षण याअंतर्गत या सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलीय.
मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई ते मडगाव दरम्यान, एसी डबलडेकरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन सुविधा देण्यात येणार आहे. मुंबई-मडगाव, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, यांसह एकुण ६ गाड्यांमध्ये या अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या सुविधांमध्ये ट्रेनमध्ये ऑन बोर्ड हाऊसकिपिंग स्टाफ, पीव्हीसी फ्लोरींग आणि दर दोन तासांनी टॉयलेट स्वच्छ करण्याची सुविधा यात देण्यात येईल. तर ट्रेनमध्ये फायर फायटिंगची अत्याधुनीक साधन सामग्रीचा देखील समावेश करण्यात येणारे. प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि प्रोजेक्ट सक्षण याअंतर्गत या सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलीय.
रेल्वेच वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक - रेल्वे बोर्ड
दरम्यान, सर्वसामान्यांना रोज सहन कराव्या लागणाऱ्या रेल्वेच्या लेटमार्कची दखल घेत रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी देशातील सर्वाधिक वाईट कामगिरी करणाऱ्या १० विभागांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली. यामध्ये मध्य रेल्वे विभागाचाही समावेश होता. रेल्वे बोर्डातर्फे देशातील सर्व विभागीय रेल्वेच्या वेळेबाबत पाहणी केली. यानुसार मध्य रेल्वेवरील रेल्वे उशिराने धावत असल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील ट्रेनचा या पाहणीत समावेश होता. मध्य रेल्वेच्या केवळ ५४ टक्के रेल्वे या वक्तशीरपणे धावत असल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले. रेल्वेच्या विलंबाबाबत मध्य रेल्वेच्या अधिकार्यांना खडे बोल सुनावताना अध्यक्ष अश्वनी लोहाणी म्हणाले की, प्रत्येक विभागात रेल्वेचे वेळापत्रक आहे. त्या वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक आहे. वेळापत्रकानुसार रेल्वे धावण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे.
मुंबईकरांसाठीही खुशखबर...! खास करून पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी
पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते चर्चगेट मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीसाठी आता तीन आणि सहा महिन्यांचा पासही प्रवाशांना देण्यात येणार आहे. सध्या या वातानुकूलित लोकलसाठी एकाच महिन्याचा पास या लोकल गाडीसाठी आहे. वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. २५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते चर्चगेट अशी वातानुकूलित लोकल पहिल्यांदा धावली. जानेवारी २०१८ पासून विरापर्यंत लोकल फेर्यांचा विस्तार करण्यात आला. जादा भाडे पाहता या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंका रेल्वेला होती. मात्र उकाडा वाढताच वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद वाढत गेला आहे. वातानुकूलित रेल्वेतून चर्चगेट ते विरार या एकेरी प्रवासासाठी २०५ रुपये तिकीटदर आहे तर, एका महिन्याच्या पाससाठी २ हजार ४० रुपये आकारण्यात येतात. लोकल सेवेत आल्यानंतर आतापर्यंत १७ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी एक महिन्याचा पास, तर ८२ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी तिकीट काढलेले आहे. प्रवाशांनी पासलाही दिलेल्या पसंतीमुळे पश्चिम रेल्वेने तीन आणि सहा महिन्यांचा पासही प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रस्ताव पश्चिम विभागीय रेल्वेकडून तयार करून चर्चगेट येथील रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर तो रेल्वे बोर्डाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.