मुंबई : पिंपरी चिंचवड शहरात नव्या पोलीस आयुक्तांनी नुकताच पदभार स्विकारला. दरम्यान पदभार स्विकारल्यानंतर नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्याच दिवशी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केल्यानंतर तक्रारदारांचं म्हणणं ऐकून न  घेतल्यास आणि नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास नागरिकांनी  थेट पोलीस आयुक्तांना त्यांची तक्रार व्हॉट्सअपवर करण्याचं आवाहन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 एप्रिल रोजी अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदावर बदली झाली. पोलीस आयुक्त पदाची सूत्रं त्यांनी तत्काळ हाती घेतली. यानंतर पहिल्याच दिवशी आयुक्त अंकुश शिंदे यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केलं. 


यावेळी पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या कामगिरीचा संपूर्ण आढावा घेतला. शिंदे यांनी सर्व पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. पोलीस ठाणे किंवा विविध शाखांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारल्यास तिथल्या प्रमुखाला जबाबदार धरलं जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे. 


आता थेट व्हाट्सॲपवर तक्रार


नागरिकांसाठी पोलीस आयुक्तांनी व्हाट्सॲप क्रमांक जाहीर केलाय. हा क्रमांक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आलाय. ‘पोलीस स्टेशनमध्ये जर तक्रार घेतली नाही, तर ती तक्रार 9307945182 या नंबरवर व्हाट्सअपवर करावी,’ असं फलकांवर नमूदही करण्यात आलं आहे.


पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराच्या तक्रारींचं निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.