गावखेड्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; एसटी महामंडळाने केली मोठी घोषणा
St Bus News In Marathi: एसटी महामंडळाकडे सध्या १४०० गाड्यांचा ताफा आहे. दिवाळीत गाड्याच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.
St Bus News In Marathi: दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या 2400 साध्या डिझेलबसपैकी पहिली बस रविवारी दापोडीमध्ये दाखल झाली आहे. दिवाळीपर्यंत आणखी 50 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळं दिवाळीत लालपरीच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. पालघर विभागातील आठ आगारातून 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत लांब पल्ल्याच्या 38 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर विभागाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग व परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांसाठी तिकीट दरांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुट्टीत आपल्या गावी घरी जाण्याकरिता व सुट्टीतून पुन्हा येण्यासाठी ५० टक्के सवलतीचे अर्ज वितरित करण्यात येतील. गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महामंडळाने सुरू केलेल्या विविध योजनांमुळे एसटीची प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते पाहता ताफ्यात नवीन बस येणे अनिवार्य आहे. मात्र अनेक वर्षापासून नवीन बसची खरेदीच झालेली नाही. आता एसटीच्या ताफ्यात या नव्या बसची भर पडणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल. नोव्हेंबरपर्यंत दरमहा १५० ते ३०० याप्रमाणे या बस महाराष्ट्रातील विविध एसटी आगारांमध्ये दाखल होतील. महत्त्वाचे म्हणजे या सर्व गाड्या एसटी महामंडळाच्या मालकीच्या आहेत. प्रवासी सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांची चाचणी अशोक लेलैंड कंपनीच्या तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथील कारखान्यात झाली आहे.
पुण्यातून धावणार अतिरिक्त २५० एसटी बसेस
दिवाळीनिमित्त पुण्यातून धावणार अतिरिक्त २५० एसटी बसेस धावणार आहेत. बीड, लातूर, नाशिक आणि अकोला येथून जादा बसेस मागवल्या आहेत. दिवाळीनिमित्त पुण्यातून गावी जाणाऱ्याची संख्या सर्वाधिक असल्याने जास्त गाड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी मंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येणारे आहेत. यामुळे आता पुणे विभागातून दररोज ४५० एसटी धावणार आहेत.