मुंबई : नवीन वर्षाचा (New Year 2021) आज पहिला दिवस. नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात झाल्यानंतर, सर्वजण सूर्योदयाची वाट पाहत असतात. नव्या वर्षाचा हा पहिला सूर्योदय सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो.  ही सदिच्छा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शन व्हावे यासाठी सिद्धीविनायक परिसरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलीय. ज्यांनी ऑनलाईन बुकींग केलंय त्यांनाच आतमध्ये जाऊन दर्शनाची परवानगी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर नववर्षाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील भक्तांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सकाळ पासून अनेक भक्त अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत..नववर्षाचा शुभारंभ आई आंबाबाई देवीच्या दर्शनाने करता यावा यासाठी भक्त अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहेत...विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसू दे, सर्वाना हे नववर्षं सुख समृद्धीचं जावो असं साकडं अंबाबाईला भक्तांनी घातले.


विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास


विठुरायाच्या पंढरीत मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. नववर्षानिमित्त भाविक मोठ्या उत्साहात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे गाभाऱ्यात आकर्षक साजवट केली जाते. आज जरबेरा, गुलछडी या फुलांनी मंदिर आणि मंदिर परिसर सजवण्यात आला आहे. आळंदी इथले भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही सजावट केलीय. यावेळी आलेल्या भाविकांनी कोरोनाचा कहर संपू दे अशीच प्रार्थना केलीय. 


नववर्षाची मंगलमय सुरूवात


चंद्रपुरकरांनीही नववर्षाची मंगलमय सुरूवात केली आहे. एतिहासिक महाकाली मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच हजेरी लावली होती. मास्क सोशल डिस्टन्सिंगसह भाविकांनी मंदिरात देविचं दर्शन घेतलं. कोरोनाच्या संकटकाळात सात महिने असलेलं मंदिर नियम आणि अटींसह भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. दरम्यान नवीन कोरोनाचं संकट जावो अशी प्रार्थना भाविकांनी महाकालीचरणी केली. 


साई मंदिरात फुलांची सजावट


नागपुरात नवं वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्धा मार्गावरील साई मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर फुलांच्या माळांनी सजवण्यात आलाय.नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय.मंदिराचं मुख्य द्वारही आजपासून उघडण्यात आले.


साईंच्या दरबारात हजारो भक्त


नववर्षांचं स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी साईभक्त मोठ्या संख्येनं साईंच्या दरबारात हजेरी लावतायत. रात्री १२ वाजल्यापासूनच मंदीराच्या दर्शनबारीसह मंदीर परीसरात भाविकांची मांदियाळी दिसून येतेय. चारही दर्शनबारी आणि तात्पुरत्या बनवलेल्या दर्शन बाऱ्या काल रात्री फुल होत्या त्या अद्यापही फुलच आहेत. भक्तांच्या गर्दीने शिर्डीचे रस्ते  फुलुन गेले असून साई दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  


नववर्षाच्या स्वागतानिमित्त मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आले. रात्री आतषबाजी करत साईनामाच्या जयघोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी कोरोनाचं संकट जावो आणि परिस्थिती पूर्वपदावर येवो अशी प्रार्थना भाविकांनी साईंचरणी केली. 2020 च्या शेवटच्या दिवशी जवळपास 40 हजार भाविकांनी साईंचं दर्शन घेतले.