नागपूर : ३१ डिसेंबरला एकीकडे नववर्ष स्वागत होत असताना नागपूर मात्र खुनाच्या दोन घटनांनी हादरले. नववर्षाच्या पार्टीत बळजबरीने घुसखोरी करणाऱ्या तरुणाचा जमावाने ठेचून खून केला तर दुसऱ्या घटनेत एका शुल्लक कारणावरून तडीपार असणाऱ्या गुन्हेगारांनी एका निष्पाप तरुणाची हत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये सोमवारी रात्री राजीव नगरमध्ये रणजीत धनेश्वर या १९ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला तर त्याचा अल्पवयीन साथीदार गंभीर जखमी झाला. रात्री साडे अकराच्या सुमारास राजीवनगरमध्ये नववर्षाचा जल्लोष सुरू होता. यावेळी दारूच्या नशेत असलेले रणजीत आणि अल्पवयीन साथीदार तिथे जाऊन नाचू लागले. त्यावेळी त्यांना सचिन काळे आणि इतरांनी अडवलं. हे भांडण विकोपाला गेलं आणि रणजीत आणि सन्नीला दगड, विटांनी मारहाण झाली. यात रणजीतचा मृत्यू झाला तर अल्पवयीन साथीदार गंभीर जखमी झालाय. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. 


तर दुसऱ्या एका घटनेत आकाश वाघमारे या तरुणाचा शुल्लक कारणावरून चार आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने खून केला. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपींनी आकाशच्या घराच्या दारावर लाथ मारली. दारावर लाथ का मारली, असा जाब विचारणाऱ्या आकाशवर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत त्याचा निर्घुण खून केला.


आकाश हा चांगला तरुण असून त्याचे कुणाशीही वैर नव्हतं असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. आकाशचं येत्या १० जानेवारीला लग्न ठरलं होते. मात्र लग्नाच्या १० दिवसांपूर्वी खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच या घटनांमुळे नववर्षाच्या संध्येला चोख बंदोबस्त असल्याचे पोलिसांचे दावे फोल ठरले.