सातारा : हुंडा, पाहुणचार, तामजाम या कारणातून अनेक लग्न मोडलेली ऐकलेली असाल. पण, साताऱ्यातील बोरगावमध्ये एक लग्न मोडण्याचं कारण अगदी वेगळंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरगाव येथील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. लग्नासाठी दोन्हीकडचे पै पाहुणे वऱ्हाडी मंडळी आली होती. दुपारी चारचा मुहूर्त होता. या मुहूर्तावर लग्नसोहळा सुरू झाला.


नवरीशेजारी उभ्या असलेल्या करवल्या, तर नवऱ्याच्या पाठी  उभे असलेले करवले हातात अक्षता घेऊन उभे राहिले होते. मंगलाष्टकाचे सूर हॉलमध्ये घुमू लागले. भटजींनी पहिलं मंगलाष्टक म्हटलं, शुभ मंगल सावधान म्हटलं आणि वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडल्या. 


तिसरं मंगलाष्टक संपलं आणि चौथं मंगलाष्टक सुरु झालं. अचानक नवरीकडील मंडळींनी मंगलाष्टक थांबवलं. वराकडील काही उत्साही मंडळी करवलींवर वेगाने अक्षता फेकले होते. त्यावरून हा वाद सुरु झाला.


या वादात नवरी मुलीच्या वयस्कर मामाच्याच कानफटात कुणीतरी लगावली आणि हा वाद अक्षरश: गुद्यावर आला. एकमेकांना धक्काबुक्की आरडाओरड करत, फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली.


शेवटी हा वाद पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचला. वऱ्हाडी मंडळींच्या या गोंधळांमुळे त्या नवदांपत्याच्या रेशीमगाठी जुळण्यापूर्वीच तुटल्या. हे लग्न पुन्हा जुळविण्यासाठी पोलिसांनी आपल्या परीने बराच प्रयत्न केला.


पण, मामाच्या कानफटात मारलेली चापट जिव्हारी लागल्याने हे लग्न मोडलं गेलं. या नवदाम्पत्याच्या रेशीमगाठी जुळण्यापूर्वीच आशीर्वाद देण्यासाठी टाकल्या जाणाऱ्या अक्षता त्यांच्यासाठी तापदायक ठरल्या.