निखिल वागळे हल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या 10 कार्यकर्त्यांना अटक
Nikhil Wagle Attack: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करणारे कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
Nikhil Wagle Attack: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी10 आरोपींना अटक केली आहे. पर्वती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
वागळे हल्ल्यातील 10 आरोपींची नावे
दीपक पोटे
गणेश घोष
गणेश शेरला
राघवेंद्र मानकर
स्वप्नील नाईक
प्रतिक देसरडा
दुष्यंत मोहोळ
दत्ता सागरे
गिरीश मानकर
राहुल पायगुडे
Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!
काय आहे प्रकरण?
पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत "लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा" या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. कार्यक्रमस्थळी जात असताना वागळेंच्या गाडीवर हा हल्ला झाला.
जय श्रीरामच्या घोषणा
हल्ला करणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला. हल्ला करताना निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. तसेच कार्यक्रमदेखील उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला.
काय म्हणाले वागळे?
आजवर माझ्यावर 7 वेळा हल्ले झाले. मरण माझ्या डोळ्यासमोर होतं. मी सर्व हल्लेखोरांना माफ केलंय. जिवंत आहोत तोपर्यंत संघर्ष करणार असल्याची प्रतिक्रिया निखिल वागळे यांनी दिली. मी अहिंसावादी माणूस आहे. मला मारलं तरी हजारो वागळे तयार होतील असे ते म्हणाले.
मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..या सगळ्यांचा मी ऋणी असल्याचे ट्विट वागळे यांनी केले आहे.
शरद पवारांवर एवढी टीका होते पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता आजवर पाहिला नाही, असं म्हणत वागळे यांनी भाजपला टोले लगावले आहेत. आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू? अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.