नागपूर विद्यापीठातील खंडणी प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी; निलम गोऱ्हे यांची मागणी
डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : नागपूर विद्यापीठातील खंडणी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे(Nilam Gorhe) यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांना पत्र लिहून प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे.
नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला 2023 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहे. तर, दुसरीकडे नागपूर विद्यापीठातील जनसंपर्क विभागाचे सहाय्यक प्राध्यापक धर्मेंद्र धवनकर यांनी त्यांचेच प्राध्यापकांना खंडणी मागितल्याचे प्रकरणांमुळे वातावरण तापलेले आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंपर्क विभागाचे साह्यक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी नागपूर विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागाच्या सात प्राध्यापकांना तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आली असल्याची भीती दाखवली. त्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागेल असं प्राध्यापकांना सांगितलं. लैंगिक समितीच्या संदर्भातील एका समितीमध्ये मी सदस्य असल्याचे धवनकर यांनी प्राध्यापकांना सांगितले. पण तुम्ही माझे मित्र असल्यामुळे मी तुम्हाला वाचवण्यासाठी हे सगळं करत असल्याचा बनाव केल्याचा आरोप कुलगुरू यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला.
चौकशी करून करून कारवाई करा प्राध्यापकांची मागणी
जेव्हा या सातही प्राध्यापकांना आपली फसवणूक झाली असे समजले. त्यावेळी या सातही प्राध्यापकांनी मिळून नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना एक पत्र लिहून या सगळ्या संदर्भात माहिती दिली. या तक्रारीमध्ये धर्मेश धवनकर यांनी भीती दाखवून कशा पद्धतीने खंडणी वसूल केली याची माहिती कुलगुरूंना दिली. यासाठी धर्मेश धवनकर यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सुद्धा सात प्राध्यापकांनी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही तक्रार प्राध्यापकांनी 4 नोव्हेंबर रोजी कुलगुरू यांना केली होती.
जनसंपर्क अधिकारी पदावरून हटवले
यासंदर्भात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी या तक्रारीची दखल घेतली. साह्यक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी पदाचा कार्यभार त्यांच्याकडून काढून घेतला होता. या तक्रारीवरून खुलासा मागवला. तसेच सात प्राध्यापकांकडून लैंगिक छळाची कुठलीही तक्रार कुलगुरू म्हणून माझाकडे आली नसल्याचा खुलासा कुलगुरू चौधरी यांनी केला. तसेच धर्मेश धवनकर हे कुठल्याही लैंगिक तक्रार समितीचे सदस्य नव्हते असे ही स्पष्ट केले.
सात प्राध्यापकांना पैसे का दिलेत?
नागपूर विद्यापीठातील खंडणी प्रकरणात सात प्राध्यापकांनी कुठलीही तक्रार नसताना भीतीला बळी पडून का पैसे दिले असाही प्रश्न कुलगुरू यांनी माध्यमांशी बोलतांना उपस्थित केला होता. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा याकडे लक्ष वेधले. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना लिहलेल्या पत्रात एसआयटीच्या चौकशीची मागणी केली. तसेच यामध्ये धर्मेश धवनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असे पत्रात म्हटले. याचबरोबर ज्या प्राध्यापकांनी पैसे दिले त्यांनी पोलिसांमध्ये का तक्रार केली नाही? ते कोणत्या भीतीला बळी पडले. किंवा लैंगिक शोषण करून पैसे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना? याचीही संपूर्ण चौकशी करावी असेही उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले आहे.
पोलीस आयुक्तां मार्फत चौकशी करावी
या संदर्भात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी कुलगुरू यांना तक्रार करत धवनकर यांचवर निलंबनाची मागणी केली होती. या प्रकरणात तक्रारीनंतरही आठ ते दहा दिवस का दखल का घेतली नाही असा आरोप केला होता. तसेच या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यामार्फत चौकशी करावी अशीही मागणी केली होती.