Karjat MIDC : गेल्या काही दिवसांपासून कर्जतमधील एमआयडीसीवरुन (MIDC) भाजप (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांच्यात जुंपली आहे. एमआयडीसी होणारी जमीन ही नीरव मोदी (Nirav Modi) यांची आहे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. मतदार संघातील युवकांना आणि शेतकऱ्यांना रोजगार मिळावा अशीच माझी पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र रोहित पवार हे राजकारण करत आहेत असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. नीरव मोदींचे नाव घेऊन एमआयडीसीसाठी विलंब लावू नका, त्यांना जागा कुणी दिल्या याची चौकशी करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी असं ऐकलं आहे की अदानी, चोक्सी यांचे उद्योगधंदे इथे येऊ पाहत आहेत. त्यांना फक्त कर्जतला यायचं आहे. जामखेड 50 किमीवरुन असून ते तिथे का येत नाहीत? जे कोणी माझ्यावर आरोप करत आहेत त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. शासनानं 2002 साली त्यांना मोबदला दिला आहे. ती जागा उद्योग विभागाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करु नयेत," असे आमदार राम शिंदे म्हणाले.


"नीरव मोदी यांचे नाव राम शिंदेंनी काढलेलं आहे. तर ही जमीन 2011 ते 2014 या दरम्यान घेतलेली आहे. मी सरकारला विनंती करतो की, 2011 ते 2014 मध्ये नीरव मोदीने कंपनीच्या माध्यमातून आणि स्वतः इथे जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनी घेताना कोणी मदत केली याची शाहनिशा राज्य सरकारने केली पाहिजे," असे आमदार रोहित पवार म्हणाले.


 



तुमचं सरकार असताना कर्जतमध्ये उद्योग का आणले नाहीत? - राम शिंदे


"तीन महिन्यांच्या आतमध्ये एमआयडीसीबाबत निर्णय होईल. पण, एमआयडीच्या जागेसंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकऱ्यांच्या जागा गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. सुशिक्षित बेरोजगार आणि नवयुवकांना काम मिळालं पाहिजे. पण,1986 मध्ये स्थापन झालेल्या जामखेडच्या एमआयडीसीबद्दल का बोलत नाहीत? तुमचं सरकार असताना कर्जतमध्ये उद्योग का आणले नाहीत? ग्रामपंचायत, मार्केट समितीत पराभव झाला आहे. त्यामुळे हा नवीन फंडा काढला आहे. दुसऱ्यांवर चिखलफेक करून काहीही होणार नाही," अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केली होती.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी  रोहित पवारांनी एमडीसीच्या प्रश्नासाठी विधिमंडळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं होतं. त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठकीचं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र यानंतर रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात वाद उफाळून आला आहे.