निर्भया दोषींना फाशी : अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन मागे
निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी मौनव्रत आंदोलन मागे घेतले.
राळेगणसिद्धी, अहमदनगर : दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले मौनव्रत आंदोलन मागे घेतले आहे. राळेगण सिद्धी येथील यादवबाब मंदिरात यादवबाबांचे दर्शन घेऊन अण्णांनी आपले मौन व्रत सोडले. २० डिसेंबरला अण्णांनी मौन व्रत धरले होते.
तब्बल ९२ दिवसानंतर अण्णांनी आपले मौन व्रत सोडले आहे. आरोपींना फाशी दिल्याने न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल, अशी प्रतिक्रिया अण्णांनी यावळी दिली. मात्र शिक्षेची अंमलबजावणी व्हायला सात वर्षे लागल्याने हा विलंब का, झाला याचा अभ्यास करून केंद्र आणि राज्यांनी कठोर कायदे करावे, अशी मागणी देखील अण्णा हजारे यांनी केली आहे.
दरम्यान, निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यास उशीर झाला. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला मात्र अखेर न्याय मिळल्याची प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिलीय. तसेच अखेर सात वर्षांनी निर्भयाला न्याय मिळाल्याने दिल्ली निर्भयाच्या वडिलांनी समाधान व्यक्त केलंय. तर निर्भया प्रकरणात सरकारी प्रक्रियेला उशीर लागला मात्र न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया निर्भयाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींना अखेर फासावर लटकवण्यात आले. त्यानंतर तिहार जेलबाहेर नागरिकांनी जल्लोष केला. फाशी झाल्यामुळे यापुढे असं दुष्कृत्य करण्यास धजावणार नाही अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते.