`...त्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल`, शरद पवारांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत.
दीपक भातुसे, झी मीडिया, रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांनी निशाणा साधला.
'या वादळाची दाहकता सगळ्यांना समजली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी दौरे केले पाहिजेत. मी दुष्काळी भागातून येतो. फडणवीस विदर्भातून येतात, त्यामुळे त्यांचा आणि समुद्राचा संबंध नाही. फडणवीस येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांना इथली स्थिती समजेल,' असं टोला शरद पवारांनी हाणला.
'निसर्ग'चा फटका बसलेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा- शरद पवार
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, अशी मागणी पवारांनी केली आहे.
बागांच्या नुकसानीसाठी मदत देताना पुढील सहा ते सात वर्षांचा विचार करुन द्यावा लागेल. कारण हे पिक एका दिवसात उभं राहत नाही, यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलणार असल्याचंही पवार म्हणाले.