मी दिल्लीत खासदार, निलेश आणि नितेश विधानसभा लढवणार- राणे
आताचा प्रवेश कोणत्याही कमिटमेंटशिवाय असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई : भाजपात प्रवेशाबाबत मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपात माझा पक्ष विलिन करणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. एक तारखेला माझा प्रवेश होणार नसून मुख्यमंत्री आणि मी यावर चर्चा करुन निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. मी दिल्लीत राज्यसभा खासदार आहे. निलेश आणि नितेश विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजपाने 2017 साली मी सहयोगी सदस्य असताना मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. आताचा प्रवेश कोणत्याही कमिटमेंटशिवाय असल्याचेही ते म्हणाले.
नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्ग जिल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशाने कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बिघडणार आहेत. राणेंना पक्षात घेऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा आहे. राणेंचा पक्ष प्रवेश हा शिवसेना विरोधामुळे लांबला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना पक्षात घेण्यासाठी मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे.
कोकण आणि राणे असे समीकरण गेल्या काही वर्षात कोकणात पाहायला मिळत आहे. राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा मोठा भूकंप कोकणात झाला. त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये स्थिरावले. राणेंच्या माध्यमातून सिंधुदुर्ग काँग्रेसमय झाला. मात्र राणेंनी भूमिका पुन्हा बदलली आणि त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र दोन वर्षातच राणेंची भूमिका परत बदलली आहे. आता राणे भाजपावासी होणार आहेत. साहजिकच जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहेत. मात्र या बदलत्या परिस्थितीत राणे विरोधी असलेल्या काही नेत्यांचा सूर आता बदलू लागला आहे.
नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याने सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो. कारण शिवसेना - भाजप एक झाल्याशिवाय राणेंचा सामना करणे शिवसेनेला शक्य नाही. राणेच भाजपमध्ये गेल्यास सेनेला गणित बदलावी लागतील एका बाजूला भाजपाची राणेंबाबतची सॉफ्ट भूमिका पाहून दीपक केसरकर मात्र पुन्हा आक्रमक झाले आहेत.
राणे भाजपमध्ये गेल्यास राणेंसोबत असलेले काही पदाधिकारी शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. यात कणकवली आणि सावंतवाडीमधील प्रमुख नेत्यांचा समावेश असू शकतो.