मोठी बातमी: नितेश राणेंसह १९ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
वकिलांचे एक पथक सातत्याने नितेश यांच्या जामीनासाठी प्रयत्न करत होते.
कणकवली: महामार्ग उपअभियंत्यावर चिखल ओतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आमदार नितेश राणे यांना बुधवारी न्यायालयाकडून अचानकपणे जामीन मंजूर करण्यात आला. दिवाणी न्यायालयाने नितेश यांना मंगळवारीच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
नितेश यांना ४ जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांची रवानगी ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली होती. ही मुदत संपल्यामुळे नितेश यांना आज पुन्हा दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी नितेश यांना जामीन मिळेल, अशी राणे समर्थकांची अपेक्षा होती. मात्र, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यामुळे राणे समर्थकांना मोठा धक्का बसला होता.
यानंतर वकिलांचे एक पथक सातत्याने नितेश यांच्या जामीनासाठी प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून न्यायालयाने नितेश यांच्यासह स्वाभिमानीच्या १९ कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे नितेश लवकरच तुरुंगातून बाहेर येणार असले तरी त्यांना दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.
नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी मु्ंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली होती. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधूनही ठेवण्यात आले होते.