शांत बसा नाहीतर थप्पड खाल; जय विदर्भच्या घोषणा देणाऱ्यांना गडकरींनी झापले
घोषणबाजी करणाऱ्यांना थप्पड लगावा
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान जय विदर्भचे नारे लगावणाऱ्या आंदोलकांना चांगलेच झापल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील फुटाळा परिसरात नागपूरमधील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात हा प्रकार घडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांचे भाषण सुरु असताना विदर्भवाद्यांनी घोषणा देत पत्रके सभास्थळी फेकली. यामध्ये २०१४ मध्ये गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख होता. गडकरींनी २०१४ दिलेले आश्वासन पूर्ण करावे, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, अशा घोषणाही विदर्भवाद्यांनी द्यायला सुरुवात केली. त्यावेळी गडकरी चांगलेच संतापले. त्यांनी पोलिसांना घोषणबाजी करणाऱ्यांना थप्पड लगावा, असा आदेशही दिला. आरडाओरड बंद करा नाहीतर थप्पड खाल आणि तुम्हाला बाहेर काढण्यात येईल, असा दम त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना भरला.
गडकरींच्या आदेशानंतर पोलीस व भाजपाच्या कार्यकर्त्यानी विदर्भवाद्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला. यापुढे नितीन गडकरी व मुख्यमंत्री जिथे जिथे जातील त्या भागातील विदर्भवाद्यांनी 'विदर्भ केव्हा देता?' हा प्रश्न जाहीर सभेतुन विचारावा आणि या प्रश्नांचे उत्तर नाही दिले तर त्यांचा जाहीर सभेत निषेध करा, असे आवाहनही विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.