नागपूर : भाजपसाठी या पाच राज्यांच्या निवडणुका महत्वाच्या होत्या. या निवडणुकीत जे यश मिळालं ते जनतेचा भाजपवर असलेला विश्वास आणि भाजपचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा निवडणुकीत भाजपाला यश मिळवून देणारे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. 


नितीन गडकरी म्हणाले, गोव्यात आम्ही १९९५ पासून काम करत आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही भाजपला इतक्या जागा कधी मिळाल्या नाही. मात्र, गोव्याच्या जनतेने यावेळी पूर्ण बहुमत दिले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले.


गोवा निवडणुकीत भाजपाला अपशकुन करण्यासाठी अनेक पक्ष रिंगणात उतरले होते. शिवसेना, राष्ट्रवादी यांनी युती करून त्यांनी कंबर कसली. पण, गोव्याच्या जनतेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे आणि विरोधी पक्षांचे काय स्थान आहे हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे.


मणिपूरमध्ये भाजपचा भक्कम पाया उभा राहिला. म्यानमरपर्यंत आपण रोड बांधले. देशातील जातीपातीचे राजकारण नाहिसे करून देशाचा विकास करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यानुसार भाजपची वाटचाल सुरु आहे.


देशातून जातीयता समूळ नष्ट करून विकासाच्या मुद्यावर राजकारण करावे. आत्मनिर्भर देश कसा होईल याकडे लक्ष देऊन त्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. 'सबका साथ, सबका विश्वास' हे फक्त बोलण्यापुरते नाही तर कृतीतून दाखवायचे आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितले.