मी लक्ष्मीदर्शन घेत नाही, नितीन गडकरींचा जोरदार टोला
नितीन गडकरी यांनी जालन्यातील वाटूर इथं झालेल्या कार्यक्रमात मी लक्ष्मीदर्शन घेत नाही, असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना काढलाय. यावेळी रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणा-या कॉन्ट्रॅक्टर्सवरही गडकरींनी निशाणा चढवलाय.
जालना : बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःची कार्यशैली जालन्यातल्या जनतेसमोर मांडली. जालन्यातील वाटूर इथं झालेल्या कार्यक्रमात मी लक्ष्मीदर्शन घेत नाही, असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना काढलाय. यावेळी रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणा-या कॉन्ट्रॅक्टर्सवरही गडकरींनी निशाणा चढवलाय.
दरम्यान, ठेकेदाराने रस्तेबांधणीचे काम नीट केले नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दांत भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी इशारा दिला आहे. यासोबतच देशात आजवर मी सहा लाख कोटीची काम केली, पण आजवर लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना टोला लगावला.
नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर, दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरदेखील उपस्थित होते.
आजवर एकाही ठेकेदाराच्या पैशाचा मी मिंदा नाही, असे सांगत शेगाव-पंढरपूर रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे, असंही गडकरींनी सांगितले. 'रस्त्याचे काम चांगले होत नसेल, तर फक्त मला कळवा. या ठेकेदाराला मी बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच गडकरींनी दिला.